राहाता तालुक्यात कृषी विभाग व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या “सत्यमेव जयते फार्मर कप” स्पर्धेअंतर्गत शेतकरी गट बांधणीचे व्यापक काम सुरू असून या उपक्रमाला शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या उपक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, उपविभागीय कृषी अधिकारी संगमनेर अक्षय गोसावी तसेच तालुका कृषी अधिकारी राहता आबासाहेब भोरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
याच पार्श्वभूमीवर दि. २४ मे २०२६ रोजी पिंपरी निर्मळ येथे “सरस्वती शेतकरी महिला गट” यांच्या माध्यमातून नैसर्गिक शेतीशाळा अंतर्गत गांडूळ खत निर्मिती प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले. गटातील महिला व पुरुष सदस्यांनी सामूहिक सहभाग नोंदवत सवाड पद्धतीने गांडूळ खत बेड तयार केला.
यावेळी आत्मा तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किशोर कडू यांनी गांडूळ खत बेड उभारणी, त्यामध्ये घ्यावयाची काळजी तसेच गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. शेतातील काडी-कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती करून रासायनिक खतांचा वापर कमी करण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.
मंडळ कृषी अधिकारी लोणी रमेश चोपडे यांनी कृषी योजनांच्या माध्यमातून गांडूळ खत निर्मितीबाबत माहिती देत गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र असून जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी त्याचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच सहायक कृषी अधिकारी तथा पाणी फाउंडेशन मेन्टर राजेश पऱ्हे यांनी सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेच्या मूल्यांकन निकषांची माहिती दिली.
सहाय्यक कृषी अधिकारी जया निमसे यांनी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक व त्याचे फायदे याविषयी मार्गदर्शन केले. पाणी फाउंडेशनचे समन्वयक वैभव गारुडकर यांनी स्पर्धेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन स्पष्ट केले.
सरस्वती महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा मीनाताई निर्मळ यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. यावेळी आबा निर्मळ, वनिता निर्मळ, सुवर्णा निर्मळ, माया निर्मळ, सविता निर्मळ, कविता निर्मळ, सुरेखा निर्मळ, गणेश निर्मळ, मोहिनी निर्मळ, रवींद्र निर्मळ, स्वाती निर्मळ यांच्यासह गटातील महिला व शेतकरी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments