टाकळीभान प्रतिनिधी- बाजार समितीमध्ये कांद्याच्या लिलावात प्रथम बोली १० रुपये किलोपासून सुरू करावी. लिलावाच्या वेळी अनुपस्थित राहणाऱ्या व्यापाऱ्यांचे बाजार समितीचे परवाने रद्द करावे, अशी मागणी शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी समिती प्रशासनाकडे केली आहे.
शुक्रवारी (दि.२२) कांदा लिलाव सुरू होताना व्यापाऱ्यांनी १ रुपयांपासून बोली सुरू केली. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली. कांद्याचे दर घटल्यामुळे शेतकऱ्यांनी अॅड. अजित काळे यांच्याशी संपर्क साधत हस्तक्षेपाची मागणी केली.
बाजार अॅड. अजित काळे लिलावास्थळी तातडीने पोहचले. शिष्टमंडळासह समितीच्या कार्यालयात जाऊन सचिव साहेबराव वाबळे व व्यापाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. लिलावाच्या वेळी उपस्थित नसणाऱ्या व्यापाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी केली. तसेच लिलावाच्या वेळी बाजार समितीचे निरीक्षक उपस्थित रहावे, लिलावाची बोली ही आडत्यांनी न करता बाजार समितीचे अधिकृत अधिकाऱ्यांनी केली पाहिजे. तसेच हमाली व तोलाई कपातीचा मुद्दा पुढे करत जिल्हा उपनिबंधक अहिल्यानगर यांचे २ मे २०२५ चे परिपत्रकाचे प्रमाणे योग्य असल्याचे बाजार समितीने नमूद केले असता अॅड. काळे यांनी हे परिपत्रक असून कायदा नसल्याचे सांगितले. हमाली व तोलाईची क पात बेकायदेशीर असल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट आक्षेप नोंदविला.
सचिव वाबळे यांनी यापुढे शेतकऱ्यांचे बिलातून हमाली, तोलाई कपात केली जाणार नसल्याचे सांगत पत्रक जारी करण्याचे आश्वासन दिले. काळे यांनी आजपर्यंत वसूल केलेली हमाली व तोलाईची रक्कम शेतकऱ्यांना परत करण्याची मागणी केली. तसेच नाफेडचा नियम लागू करून मोकळा कांदा लिलाव पद्धत तातडीने सुरू करण्याची मागणी केली. शेतकऱ्यांच्या वरील मागण्या बाजार समिती प्रशासनाने मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा काळे यांनी दिला.
0 Comments