स्पर्धांमध्ये जिंकण्यासाठी खेळा; मात्र कामात निष्ठा कायम ठेवा - डॉ. सुस्मिता विखे पाटील डाॅ.सुजय विखे पाटील यांनी केले क्रिडा स्फर्धेचे उद्याटन..



लोणी दि.१७ प्रतिनिधी
प्रवरा सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून आपल्या समृद्ध संस्कृतीचा जागर होत असतानाच क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून सांघिक भावना, एकोपा आणि परस्पर समन्वयाची जडणघडण व्हावी, या उद्देशाने क्रीडा स्पर्धांना विशेष महत्त्व देण्यात आले आहे. प्रत्येकाने स्पर्धेत जिंकण्यासाठी खेळावे; मात्र जीवनातील प्रत्येक काम करताना निष्ठा, प्रामाणिकपणा आणि समर्पणाची भावना कायम ठेवावी, असे प्रतिपादन लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुस्मिता विखे पाटील यांनी केले.

जलसंपदा तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून तसेच प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील आणि डॉ. सुस्मिता विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित प्रवरा सांस्कृतिक क्रीडा महोत्सवातील क्रीडा स्पर्धांच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या.

यावेळी संस्थेतील शाळा, महाविद्यालये तसेच कर्मचाऱ्यांसाठी आयोजित मुला-मुलींच्या हॉलीबॉल स्पर्धेचे उद्घाटन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी खेळामध्ये सांघिक भावना कायम ठेवत जिंकण्यासाठी प्रयत्न करा, असा संदेश दिला.

प्रवरा सांस्कृतिक महोत्सवात बालगोपाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच क्रीडा स्पर्धांनाही विशेष स्थान देण्यात आले आहे. संस्थेतील विविध खेळाडूंना आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम या माध्यमातून केले जाते. क्रीडेतून शिस्त, संघभावना, सामाजिक बांधिलकी आणि परस्पर सहकार्याची भावना विकसित होते, असे यावेळी सांगण्यात आले.

प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या फार्मसी महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर झालेल्या या कार्यक्रमास शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, शिक्षण संचालिका सौ. लीलावती सरोदे, डॉ. महेश खर्डे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रविंद्र जाधव, आयटीआयचे अर्जुन आहेर, आस्थापना विभागाचे सागर शेगांवकर यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक, कर्मचारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments