पावसाच्या खंडामुळे कापसाची फुलपाती, मक्याचे कणीस अन् सोयाबीनच्या दाणेभरणीवर परिणाम, कृषी विभागाचे बांधावर मार्गदर्शन-----




दिलीप शिंदे 
सोयगाव, दि. १९---- सोयगाव तालुक्यात यंदा सुरुवातीच्या काळात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये पावसाने मोठा खंड दिल्याने खरीप पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होऊ लागला आहे. कापसाची फुलपाती, मक्याच्या कणसाची वाढ तसेच सोयाबीनच्या शेंगांची वाढ व दाणे भरण्यावर परिणाम होत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

 त्यामुळे कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत.सोयगाव तालुक्यात एकूण ४२ हजार ६१५ हेक्टर लागवडीलायक क्षेत्र असून यंदा ४२ हजार ४८५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये कापसाचे २८ हजार २०६ हेक्टर, मक्याचे ६ हजार ६९३ हेक्टर आणि सोयाबीनचे ४ हजार २५८ हेक्टर क्षेत्र आहे. याशिवाय फळबाग व इतर पिकांचीही लागवड करण्यात आली आहे.तालुक्यात दि.१९ सप्टेंबर अखेर सरासरीच्या १०९ टक्के पावसाची नोंद झाली आहे. महसूल मंडळनिहाय जरंडी येथे १३९ टक्के, सोयगाव १३४ टक्के, बनोटी ८८ टक्के तर सावळदबारा मंडळात ८१ टक्के पाऊस झाला आहे.
मात्र महिनानिहाय पावसाकडे पाहता जूनमध्ये सरासरीच्या १०० टक्के, जुलैमध्ये १९७ टक्के, ऑगस्टमध्ये केवळ ५५ टक्के आणि सप्टेंबरमध्ये ३४ टक्के पाऊस झाला आहे. सुरुवातीच्या वाढीच्या काळात चांगला पाऊस झाल्यानंतर सध्या पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या वाढीवर त्याचा परिणाम जाणवत असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले असून सध्याची पीक परिस्थिती लक्षात घेऊन सोयगाव कृषी विभागातील क्षेत्रीय कृषी अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांच्या बांधावर प्रत्यक्ष भेटी देत असून, पिकांच्या सद्यस्थितीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन करीत आहेत.
तालुका कृषी अधिकारी भरत कासार यांच्या मार्गदर्शनाखाली विजय निकुंभ, अर्जुन सुरळकर, वैष्णवी भगत, कविता अहिरराव, वैष्णवी नन्नवरे, आरती बावस्कर यांनी पाहणी केली तसेच तालुक्यात पिकांची पाहणी सुरू असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments