दिलीप शिंदे
सोयगाव दि.१९-- सोयगाव तालुक्यातील मोहळाई येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाली असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पावसाळ्यात इमारतीचे छत गळत असल्याने, कार्यालयाचे आणि दस्तऐवजांचे संरक्षण करण्यासाठी चक्क छतावर प्लॅस्टिकचा कागद टाकून तात्पुरता सहारा घेण्याची वेळ प्रशासनावर आली असून यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.
शाळेच्या मुख्याध्यापक कार्यालयाच्या छतावर प्लास्टिक पसरवून त्यावर दगड व विटा ठेवून ते टिकवण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा आणि गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मोलमजुरी करणाऱ्या गोरगरिब शेतकऱ्यांची मुलं जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाचे धडे गिरवत असल्यामुळे प्रशासनाकडून शाळा दुरुस्तीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.या गंभीर प्रकरणाकडे लोकप्रतिनिधी व प्रशासन विद्यार्थ्यांचे भवितव्याकडे लक्ष देणार की दुर्लक्ष करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.दरम्यान शासकीय स्तरावर जिल्ह्याचे नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' असे करण्यात आले असले, तरी या शाळेच्या दर्शनी भागावर मात्र अजूनही 'जि. औरंगाबाद' असाच उल्लेख कायम आहे. मुख्याध्यापकांच्या कार्यालयासमोरच असलेल्या या दर्शनी भागावर अद्यापही नावाचा बदल करण्यात आलेला नाही. यामुळे शिक्षण विभाग आणि संबंधित प्रशासनाच्या उदासीन व निष्काळजी कारभाराचे दर्शन घडत आहे.
या प्रकारामुळे ग्रामस्थ व पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन शाळेच्या इमारतीची दुरुस्ती करावी आणि नावात आवश्यक तो बदल करावा, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
0 Comments