प्रवरानगर महसूल समाधान शिबिरात पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आयुष्मान भारत कार्ड तयार



लोणी, दि. २२ (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त प्रवरानगर (लोणी) येथे आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियान' अंतर्गत विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली.

याच अभियानादरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांचे आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्मान भारत कार्ड तयार करण्यात आले.

यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय घोलप व अहिल्यानगर जिल्हा आयुष्मान भारत (PM-JAY) डिस्ट्रिक्ट टीम तसेच जिल्हा पर्यवेक्षक दिगंबर कौसे आणि आरोग्यमित्र तुषार भुसाळ, दीपक दातीर, छाया अकोलकर, लखन गव्हाणे, अक्षय जगधने,उपस्थित होते. लाभार्थ्यांना आयुष्मान भारत योजनेची माहिती देणे, पात्र नागरिकांची नोंदणी करणे व तत्काळ आयुष्मान कार्ड तयार करून देणे, या सुविधा शिबिरात उपलब्ध करून देण्यात आल्या.

शासनाच्या आरोग्यविषयक योजनांचा लाभ अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात अनेक नागरिकांनी आयुष्मान भारत कार्ड नोंदणीचा लाभ घेतला. शासकीय सेवा नागरिकांच्या दारात पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Post a Comment

0 Comments