लोणी प्रतिनिधी - रूपाली भालेराव
पिंपरी निर्मळ (ता. राहाता) : पाणी फाउंडेशन, कृषी विभाग आणि उमेद अभियान यांच्या संयुक्त मार्गदर्शनाखाली पिंपरी निर्मळ येथील सरस्वती महिला शेतकरी गटाने सोयाबीन पिकाच्या संरक्षणासाठी एक आदर्श आणि प्रेरणादायी उपक्रम राबवून परिसरातील शेतकऱ्यांसमोर नवा आदर्श निर्माण केला आहे.
गटाच्या अध्यक्षा मीनाताई निर्मळ यांच्या नेतृत्वाखाली गटातील सर्व महिला एकत्र आल्या आणि सोयाबीन पिकामध्ये पक्षी थांबे, चिकट सापळे आणि कामगंध (फेरोमोन) सापळे शास्त्रोक्त पद्धतीने उभारण्याचे काम सामूहिकरित्या पूर्ण केले. या उपक्रमामुळे प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात एकसमान पद्धतीने कीड व्यवस्थापनाची प्रभावी अंमलबजावणी झाली.
या उपक्रमाला कृषी सहायक अधिकारी तथा गटाचे मेंटर राजेश पऱ्हे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. त्यांनी वेळोवेळी व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल, दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष शेतभेटी घेऊन महिलांना योग्य वेळी तांत्रिक माहिती दिली. पक्षी थांबे कधी उभारावेत, चिकट सापळे कोणत्या अंतरावर लावावेत, कामगंध (फेरोमोन) सापळ्यांचा उपयोग कसा करावा आणि त्यातून पिकाचे नुकसान कसे टाळता येते याबाबत त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या उपक्रमासाठी तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे, मेंटर कृषी अधिकारी राजेश पऱ्हे, मंडळ कृषी अधिकारी रमेश चोपडे, विभागाच्या जया निमसे, तसेच पाणी फाउंडेशनचे मेंटर वैभव गारुडकर , तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक किशोर कडू यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रेरणेमुळे महिलांमध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण झाली.
विशेष म्हणजे, अध्यक्षा मीनाताई निर्मळ यांनी केवळ नेतृत्वच केले नाही, तर स्वतः प्रत्येक शेतात उपस्थित राहून महिलांसोबत प्रत्यक्ष श्रमदान केले. त्यांच्या नेतृत्वामुळे गटातील सर्व महिलांमध्ये एकजूट निर्माण झाली असून "एकीचे बळ म्हणजे शेतीचे यश" हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.
महिलांनी सामूहिक पद्धतीने केलेल्या या कामामुळे कीड नियंत्रण अधिक प्रभावी होणार असून रासायनिक फवारण्यांवरील खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. पर्यावरणपूरक शेती, उत्पादनात वाढ आणि खर्चात बचत या तिन्ही बाबींमध्ये हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार असल्याचा विश्वास कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केला.
आजच्या काळात महिला केवळ घरापुरत्या मर्यादित न राहता आधुनिक शेतीतील नवे तंत्र आत्मसात करून गावाच्या कृषी विकासात मोलाची भूमिका बजावत आहेत. पिंपरी निर्मळ येथील सरस्वती महिला शेतकरी गटाने केलेले हे कार्य इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत असून ग्रामीण भागातील महिला संघटनशक्ती आणि प्रत्यकीच्या शेता मध्ये सामूहिक शेती व्यवस्थापनाचा हा एक आदर्श नमुना मानला जात आहे.
सत्तेचा महासंग्राम --
प्रतिनिधी-- रूपाली भालेराव
सहसंपादक -- साबळे ज्ञानेश्वर
0 Comments