दिलीप शिंदे
सोयगाव, दि. २२ -- मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष आणि समर्पण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दि. २२ बुधवारी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे आयोजित मुख्यमंत्री जनआरोग्य शिबिरात सोयगावच्या इतिहासात प्रथमच २००० नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतल्याने समर्पण फाऊंडेशन च्या युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
या शिबिराला सोयगावसह परिसरातील गावांमधून नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात मेडिसिन, जनरल सर्जरी, कर्करोग, हृदयरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, कान-नाक-घसा, दंतरोग, बालरोग आदी विविध शाखांतील तज्ज्ञ डॉक्टरांनी नागरिकांची तपासणी करून मोफत उपचार व मार्गदर्शन केले. गंभीर स्वरूपाचे आजार असलेल्या रुग्णांना पुढील विशेष उपचारासाठी संबंधित तज्ज्ञ रुग्णालयांकडे संदर्भित करण्यात आले. तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदा आरोग्य शिबिरात २,००० रुग्णांची तपासणी करण्यात आली. असून त्यापैकी ६८ रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले. तसेच गरजूंना ६०० चष्म्यांचे आणि दिव्यांग व वयोवृद्ध ५६८ व्यक्तींना चालण्याच्या काठ्यांचे मोफत वाटप करण्यात आले. शिबिरादरम्यान २७ रुग्णांना सलाईन, ५०० आयड्रॉपचे वितरण, ११२ रक्त तपासण्या आणि ८६ ईसीजी तपासण्या करण्यात आल्या. विविध आजारांचे प्राथमिक निदान, आवश्यक औषधोपचार, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि पुढील उपचारांची सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. या शिबिरात ग्रामीण रुग्णालय सोयगाव, रूबी स्टार रुग्णालय जामनेर, शासकीय कर्करोग रुग्णालय छत्रपती संभाजीनगर, मराठवाडा कॅन्सर रुग्णालय, जे. जे. प्लस रुग्णालय, ओरियन सिटिकेअर रुग्णालय, सेंचुरी रुग्णालय, सेठ नंदलाल धूत रुग्णालय, डॉ. हेडगेवार रुग्णालय, कर्णावत कर्करोग रुग्णालय तसेच संतपुरे रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टर व वैद्यकीय पथकांनी सहभाग नोंदवत आरोग्यसेवा दिली. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी समर्पण फाउंडेशनच्या संपूर्ण पथकाने नियोजन, समन्वय आणि अंमलबजावणीत विशेष परिश्रम घेतले. विविध रुग्णालयांचे सहकार्य, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि स्थानिक प्रशासन यांच्या समन्वयामुळे हे जनआरोग्य शिबिर यशस्वीरीत्या पार पडले. ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा त्यांच्या दारात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे शिबिर अत्यंत उपयुक्त ठरले असून, अशा उपक्रमांमुळे गरजू रुग्णांना वेळेत उपचार मिळण्यास मोठी मदत होत असल्याची भावना उपस्थित नागरिकांनी व्यक्त केली.
0 Comments