राजुरी( वार्ताहर :) पंढरपूरच्या पांडुरंगाच्या ओढीने शेकडो मैल पायी चालणाऱ्या वारकऱ्यांच्या चरणांची सेवा करण्यासाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टचे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील प्रवरा ग्रामीण रुग्णालय पुढे आले आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या चमूने राजुरी (ता. राहाता) येथे मोफत वैद्यकीय शिबीर राबवून सुमारे एक हजार वारकरी बांधवांना मोफत वैद्यकीय सेवा व औषधोपचार पुरविले.पंढरपूर वारीत सतत पायी प्रवास करावा लागत असल्याने वारकऱ्यांना जुलाब, ताप, अंगदुखी, पायाला फोड येणे, भेगा पडणे आणि शरीरात पाण्याची कमतरता भासणे अशा विविध आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते.
या पार्श्वभूमीवर, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील आणि व्यवस्थापन उपसंचालक ध्रूव विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चरण सेवा व औषधोपचार करण्यासाठी राजुरी येथे या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात १०० जणांच्या वैद्यकीय चमूने प्रत्येक वारकऱ्याची आस्थेने काळजी घेत अनेक आजारांवर योग्य उपचार केले. यामध्ये दंतचिकित्सा, मधुमेह (साखरेचे आजार) आणि रक्तदाब (बीपी) यांसारख्या आजारांची तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. तसेच, अतिथकवा आलेल्या काही वारकऱ्यांना सलाईनही लावण्यात आले.
राजुरी येथील यशस्वी शिबिरानंतर आता ही टीम पुढील सेवेसाठी सज्ज झाली आहे. आगामी १२ व १३ जुलै रोजी अहिल्यानगर येथे प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या वतीने पुढील मोफत वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाचे अधिष्ठाता डॉ. सतिश महाजन, रुग्णालय प्रशासक संचालक डॉ. योगींद्र सिंग, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यासह डॉ. कुशल आगाशे, डॉ. श्रीगंर चौधरी, डॉ. प्रथमेश निर्मळ, डॉ. प्रतिक मागुर, डॉ. पार्थ देव, डॉ. कौस्तुभ कुंकुलोळ, डॉ. साक्षी काजळे आणि डॉ. अनुजा सोनार यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments