लोहगाव (वार्ताहर)
राहाता तालुक्यातील प्रवरानगर गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची अथक मेहनत, शिक्षकांचे समर्पित मार्गदर्शन, पालकांचा सक्रिय सहभाग आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची प्रेरणा यांचा सुंदर संगम साधत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्रवरानगरने इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. *शाळेच्या ९ विद्यार्थ्यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळवून शिष्यवृत्ती प्राप्त केली, तर २६ विद्यार्थ्यांनी २०० पेक्षा अधिक गुण* मिळवत शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड निर्माण केला आहे.
जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविणारे विद्यार्थी पुढीलप्रमाणे – *स्नेहल साळवे (२४४), मनिष कानडे (२४०), सोनाली पाटोळे (२४०), पवन गोरे (२३४), श्रेया सकुंडे (२३२), आदर्श उनवणे (२२८), शिवानी थेटे (२२८), आराध्या मिसाळ (२२६) आणि सुजित मापारी (२२४)*
या दैदिप्यमान यशामागे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची जिद्द, चिकाटी, शिस्तबद्ध अभ्यास, आत्मविश्वास आणि यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा हीच खरी प्रेरणाशक्ती ठरली. जिल्हा परिषद अहिल्यानगरचा 'मिशन आरंभ ' उपक्रम तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या क्षमतेचा वेध घेत त्यांना योग्य दिशा देण्यासाठी *मुख्याध्यापक श्री. नामदेव फटांगरे यांच्या नेतृत्वाखाली श्रीमती मनीषा गावडे, श्रीमती मनीषा सपकाळे आणि श्री. महादेव कानडे* यांनी वर्षभर नियोजनबद्ध अध्यापन, नियमित सराव परीक्षा, वैयक्तिक मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करत अथक परिश्रम घेतले.विद्यार्थ्यांच्या यशात पालकांचा सक्रिय सहभागही तितकाच मोलाचा ठरला.
या यशासाठी पालकमंत्री *डॉ. राधाकृष्ण विखे, मा. अध्यक्षा शालिनीताई विखे* यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून *गटशिक्षणाधिकारी श्री. अभयकुमार वाव्हळ, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी श्री. राजेश पावसे, विस्तार अधिकारी श्री. विष्णू कांबळे, केंद्रप्रमुख श्री. संजय कुलकर्णी तसेच श्री. कानिफनाथ कोळेकर* यांचे वेळोवेळी लाभलेले प्रेरणादायी मार्गदर्शन, प्रोत्साहन आणि शैक्षणिक दिशा अत्यंत मोलाची ठरली.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्रवरानगरने याआधीही *नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत 1 विद्यार्थी, सैनिकी शाळा प्रवेश परीक्षेत 6 विद्यार्थी, डॉ. सी.व्ही रमण बाल वैज्ञानिक परीक्षेत 6 विद्यार्थ्यांनी पात्र होत इस्रो सहलीसाठी निवड* असे यश संपादन करत पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, जिद्द, परिश्रम, योग्य नियोजन आणि सामूहिक प्रयत्न यांच्या बळावर ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील गुणवत्तेच्या शिखरावर झेप घेऊ शकतात.
या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी, त्यांचे पालक, मुख्याध्यापक, शिक्षकवृंद यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.या यशामुळे *प्रवरानगर परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण* झाले असून शाळेच्या शैक्षणिक वाटचालीत हा आणखी एक सुवर्ण अध्याय ठरला आहे.
0 Comments