टाकळीभान(प्रतिनिधी)—श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील प्रो—कब्बडी स्टार शिवम अनिल पटारे यांना स्व.मधु पाटील पुरस्कार नूकताच जाहीर झाला असून, हा पुरस्कार दि.१५ जुलै २०२६ रोजी २६ व्या कबड्डी दिनाचे औचित्य साधत स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर नाट्यगृह, मारूती मंदिर रत्नागिरी येथे आयोजीत कार्यक्रमात प्रदान करण्यात येणार आहे.
जिद्द व चिकाटीच्या जोरावर टाकळीभानचे भूमीपूत्र शिवम अनिल पटारे यांनी कबड्डी खेळात नैपुण्य मिळविले. प्रो—कबड्डी लीग मध्ये आपल्या चमकदार खेळीने त्यांनी अनेक सिजन गाजविले व कबड्डी प्रेमींच्या मनात आपला ठसा उमटविला. अशा या खेळाडूच्या चमकदार कामगिरीची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे.
महाराष्र्ट कबड्डी असोसिएशनच्या वतीने १५ जुलै हा दिवस कबड्डीमहर्षी स्व.शंकरराव(बुवा)साळवी यांचा जन्मदिवस "कबड्डीदिन" म्हणून प्रतिवर्षी साजरा करण्यात येतो. त्या निमित्ताने गतवर्षी झालेल्या वरिष्ट गट राज्य/राष्र्टीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत विशेष कामगिरी करणार्या पुरूष गट राज्य संघातील उत्कृष्ट खेळाडूंचा स्व.मधु पाटील पुरस्काराने व महिला खेळाडूंचा स्व.अरूणा साटम पुरस्काराने प्रत्येकी रूपये दहा हजार देवून सन्मान केला जातो. बुधवार दि. १५ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी जिल्हा असोसिएशनच्या यजमानपदाखाली हा पुरस्कार शिवम अनिल पटारे यांना प्रदान करण्यात येणार आहे. शिवम पटारे यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल कबड्डी प्रेमी, सर्वच क्षेत्रातील मान्यवर तसेच टाकळीभान ग्रामस्थांनी अभिनदन केले आहे.,
0 Comments