दिलीप शिंदे
सायगाव दि. ०६-- सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांनी सोयगाव पोलिस ठाण्याचा पदभार स्वीकारताच धडक कारवाई करण्यास सुरुवात केल्याने अवैध धंदे वाईकांसह अवैधरित्या गौण खनिज व वाळू वाहतूक करणाऱ्या माफियांचे धाबे दणाणले आहे. गोरे यांनी केलेल्या कारवाई मुळे नागरिकांमधून आनंद व्यक्त केला जात आहे.
सोयगाव तालुक्यात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करणारे व चोरटी वाळू वाहतूक करणारे माफिया यांच्यावर कारवाई करण्यासाठी महसूल विभागाला सुर गवसला नसल्याने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे.महसूल विभागाला गौण खनिज विरोधात कारवाई करणेसाठी कधी मुहर्त मिळणार या विषयी नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. मात्र सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गजानन दांडगे यांनी अवैधरित्या वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर गलवाडा रस्त्यावर अजिंठा व्हॅली स्कूल जवळ सायंकाळी पावणे पाच वाजेच्या सुमारास पकडून जप्त करण्यात आले आहे.याप्रकरणी पोलिस कर्मचारी गजानन दांडगे यांनी दिलेल्या फिर्यादी वरून रामचंद्र सोनू तायडे वय ४५ वर्षे रा. गलवाडा यांच्यासह ट्रॅक्टर वर मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान सोयगाव पोलिसांनी घोसला येथील जोगेश्वरी धरणाच्या पायथ्याशी गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा टाकून २४००० हजार रुपयांचा माल जप्त केला आहे.याप्रकरणी रमजान शब्बीर तडवी वय ५० वर्षे रा. घोसला याच्यावर पोलिस कर्मचारी सादिक तडवी यांनी दिलेल्या फिर्यादी वरून सोयगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर सोयगाव येथे कल्याण मटका जुगार ठिकाणी छापा मारण्यात आला.या प्रकरणी पोहेकॉ.नारायण जिरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नारायण प्रकाश खैरनार रा. रामजीनगर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सपोनी दिनकर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली या तिन्ही कारवाया एकाच दिवशी म्हणजे शनिवारी करण्यात आल्या. तत्कालीन सपोनी यांच्या कार्यकाळात सोयगाव पोलिस ठाण्यांतर्गत सुरू असलेल्या अवैध धंदे, गौण खनिजांची चोरटी वाहतूक सर्रासपणे सुरू होती. सपोनी दिनकर गोरे यांनी कारवाईचा धडाका सुरू केल्याने गोरे यांचे नागरिकांकडून कौतुक केले जात आहे.
0 Comments