"श्रमशील वारकरी
जीवनाचे ज्ञानकरी
सेवाभावी हे संस्कारी
आहेत परोपकारी"
असे व्यक्तिमत्त्व म्हणजेच रयत शिक्षण संस्थेचे मराठी विषयाचे प्रा. डॉ. शरद भाऊसाहेब दुधाट होय. आमचे असे विद्यार्थी आता नावलौकिक मिळवत असतानाच त्यांचे 'श्रमसाफल्य' हे आत्मचरित्र वाचण्यास मिळाले आणि गौरवात्मक आनंद झाला. आत्मचरित्र ही जीवनात मागे वळून पाहताना आठवणींचा ऐतिहासिक दस्ताऐवज असतो. डॉ. शरद दुधाट यांचा १२ डिसेंबर १९७८ रोजी धामोरी येथे जन्म झाला . वडील भाऊसाहेब दुधाट व आई सौ. आशाबाई दुधाट यांचे त्यांच्यावर उत्तम संस्कार झाले. त्यांनी श्रीरामपूर येथील रावबहादूर नारायणराव बोरावके महाविद्यालयात शिक्षण घेतले. अभ्यास आणि ध्यास यांच्याशी मैत्री करीत
ते एम.ए . बी.एड एम. फिल्. पीएच.डी. झाले.रयत शिक्षण संस्थेत मराठी विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत झाले. हा त्यांचा जीवनप्रवास अनेक गुणवैशिट्यांनी अंतर्मुख करणारा आहे.
डॉ. शरद दुधाट यांचे 'श्रमसाफल्य' आत्मचरित्र म्हणजे ज्ञानतपस्वी वाटेवर त्यांनी सदैव श्रमसाधनेशी नाते कसे बांधलेले आहे ते सांगणारे हे पुस्तक आहे, त्यांची त्यांची ज्ञाननिष्ठा आणि परिश्रमशीलता दिसून येते. महाविद्यालयात असतानाच . शिक्षणाबरोबरच . त्यांचे मुख्य आकर्षण कमवा आणि शिका योजना, राष्ट्रीय सेवा योजना, महामानव डॉ. बाबा आमटे यांचे आनंदवन कार्य आणि अनेक श्रमाची शैक्षणिक कामे त्यांनी निष्ठापूर्वक केली,त्या संदर्भाचा चालता बोलता वस्तुपाठ म्हणजे हे आत्मचरित्र आहे. रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन ॲङ्. रावसाहेब शिंदे यांच्या कार्यामध्ये ते दीर्घकाळ एकरूप होते. त्यांच्यामुळेच डॉ. शरद दुधाट डॉ. बाबा आमटे, शेगावचे शिवशंकर पाटील भाऊ, अड्याळ टेकडीचे तुकाराम दादा आणि अनेक सेवाभावी व्यक्तिमत्त्वांशी त्यांचे नाते जोडले गेले, ॲङ् रावसाहेब शिंदे यांच्या लेखन कार्यानही ते सहभागी झाले, याच अनुभवांचा संदर्भ सांगताना ते मनोगतात लिहितात,
" २६ जानेवारी२०२६ रोजी साहेबांना जाऊन अकरा वर्षे पूर्ण झाली, परंतु आयुष्यातील एकही क्षण असा नाही की, त्यांची आठवण झाली नाही. दि.२२ नोव्हेंबर २०२५ रोजी मी लेखन करण्याचा निर्णय घेतला आणि कुणालाही आश्चर्य वाटेल की केवळ २१ दिवसात नियमित काम पाहून दररोज सात तास लेखन केले. हाही वेगळाच अनुभव होता. पुस्तकाच्या पुढील छपाई व इतर बाबी सोडल्या तर हस्तलिखिताचे काम अत्यावधीतच पूर्ण केले."
डॉ. शरद दुधाट म्हणजे श्रमाचे आणि ज्ञानाचे वारकरी आहेत. कारण त्यांनी आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा, अड्याळ टेकडी, शेगाव संस्थान या ठिकाणच्या श्रमतीर्थाला जीवनात सर्वात जास्त महत्त्व दिले. आनंदवन येथील कुष्ठरोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांनी आपल्या प्रस्तावनेत लिहिले आहे,
" डॉ. शरद दुधाट यांच्या साध्या... सुलभ, लेखणीतून स्रवलेले आत्मकथन... त्यांचे अपार कष्ट,.. त्यांची सर्जनशीलता निःसंशय कौतुकास्पद ठरावी. अनुभवातून साकारलेल्या आनंदाचा परिपोष लक्षात घेता सामाजिक कार्य करू इच्छिणाऱ्या युवकांना 'श्रमसाफल्य' दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करेल... यात तिळमात्र शंका नाही."
'श्रमसाफल्य' म्हणजे जीवनाचे आनंदवन आहे. जेथे माणूस माणुसकी शिकतो आणि समर्पण तत्त्वज्ञान अनुभवतो. अशी माणसे डॉ. शरद दुधाट यांच्या जीवनात आली. त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील धामोरी ' गावच्या मातीतील सोनेरी बालपण' प्रभावीपणे मांडले आहे. पणजोबा दादा पाटील दुधाट, रामभाऊ दादा दुधाट आजोबा, आजी सीताबाई अशी व्यक्तिचित्रे समोर येतात. भाऊंचे मोठे भाऊ भीमराज दुधाट रेल्वेत नोकरीला होते. त्यांचे चिरंजीव बाळासाहेब दुधाट हे शिक्षक होते, त्यांचे चिरंजीव म्हणजे डॉ. शरद दुधाट यांचे वडील भाऊसाहेब दुधाट हेही भोकर येथे शिक्षक होते. याच संदर्भातून त्यांना गावाचे शब्दचित्र प्रभावी रेखाटले आहे. 'भोकरमधील संस्काराच्या पाऊलाकुणा',' महाविद्यालयीन संस्कार आणि जडणघडण',' क्षण सहलीतील आनंदाचे',' सोमनाथ श्रमतीर्थावरील श्रमसंस्कार',' पदव्युत्तर शिक्षण: जडणघडणीचा पाया',' शिक्षिकी ध्येयाचा जीवनप्रवास',' कौशल्यातील क्षितिजे',' वसतिगृहासाठी सेवा',' श्रीरामपूर पॅटर्न',' तीर्थक्षेत्र शेगाव',' गुरुजनांच्या आठवणी' या प्रकरणात त्यांनी फार आत्मीयतेने त्यांना साह्यभूत ठरलेल्या गुरुंच्या आठवणी सांगितल्या आहेत,' शिक्षण आणि सेवापर्व',' साठवणींच्या पाऊलखुणा',' प्रबोधन आणि सेवेचे नवे दालन',' अमृतमहोत्सवी वर्ष आठवणी',' कौटुंबिक ऋणानुबंध' आणि' कोरोनाची दाहकता एक भीषण वास्तव' अशा प्रकरणातून हे आत्मचरित्र वाचकांसमोर चित्रपटांसारखे आविष्कृत होते, ते 'श्रमसाफल्य'... पर्वच्चा निमित्ताने शेवटी लिहितात," ' श्रमसाफल्य' हा संस्कारशील अनुभवजन्य प्रवासाचा शेवट नसून तो एका नव्या प्रेरणेचा उगम आहे. हा प्रवास माझा नव्हता. प्रवासात भेटलेली माणसं, सावरणारे हात या सगळ्यांच्या सहकार्य, अनुभव, संस्कार व सहवासातून हे श्रमसाफल्य साकारले आहे."
ते पुढे लिहितात,
माझ्या परिश्रमातून मिळालेले यश हेच माझ्या आयुष्याचे सर्वात मोठे यश आहे म्हणून म्हणावेसे वाटते की,
" घामातून मोती पिकले, कष्टाला फळ आले
ध्येय गाठले आज मी, स्वप्न सत्यात आले
तरीही थांबणे नाही, हा तर एक विसावा
नव्या क्षितिजाला गवसणी घालण्याचा हाच खरा ठेवा"
ही सकारात्मक आणि चल तू पुढं हो, वाट पुढंच आहे, असे
हे आत्मचरित्र म्हणजे एक ओळखीचा पट आपण अनुभवत असल्याचा प्रत्यय येतो.
डॉ. शरद दुधाट यांनी 'श्रमसाफल्य' आत्मचरित्राच्या माध्यमातून आजच्या विद्यार्थी, युवकांना एक संस्कारतीर्थ वाचनातून लाभेल. त्यामुळे या आत्मचरित्राची दखल सर्व स्तरावर घेतील अशी सदिच्छा आहे.
-------------------
परीक्षण:
डॉ. बाबुराव उपाध्ये, श्रीरामपूर
भ्रमणसंवाद:९२७००८७६४०
----------------------
'श्रमसाफल्य' आत्मचरित्र
लेखक: डॉ. शरद दुधाट
पुष्पा प्रकाशन, श्रीरामपूर
प्रथम आवृत्ती २४ मे २०२६
पृष्ठे: २४४, किंमत: ३०० रुपये
-------------------------
0 Comments