अहिल्यानगर( प्रतिनिधी)

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन आणि आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून श्रीरामपूर येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. ६ जून रोजी पार पडलेल्या या दुग्धशर्करा योगाचे औचित्य साधत आंतरराष्ट्रीय स्वाभिमानी मराठा महासंघाच्या वतीने श्रीरामपूर येथील मुख्य शिवतीर्थावर जात शिवरायांच्या जाज्वल्य इतिहासाला उजाळा देण्यात आला. 

महासंघाचे संस्थापक, छत्रपती भूषण, ख्यातनाम व्याख्याते तथा मराठा व क्षत्रिय आंदोलक डॉ. कृषीराज टकले पाटील यांच्या हस्ते शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला शास्त्रोक्त पद्धतीने दुग्धाभिषेक करण्यात आला. यानंतर महाराजांच्या मूर्तीला आकर्षक पुष्पहार अर्पण करून रयतेच्या राजाला अत्यंत आदराने मानाचा मुजरा करण्यात आला.
या मंगलप्रसंगी उपस्थित शेकडो शिवप्रेमी आणि कार्यकर्त्यांनी 'जय भवानी, जय शिवराय', 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' अशा गगनभेदी घोषणा दिल्या. या घोषणांच्या निनादाने संपूर्ण शिवतीर्थ परिसर आणि श्रीरामपूर शहर दणाणून गेले होते. शिवरायांचे स्वराज्य हे 'सर्वधर्मीय आणि अठरापगड जातींना' एकत्र घेऊन चालणारे रयतेचे राज्य होते, याच विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून या कार्यक्रमाला समाजातील सर्व घटकांची उपस्थिती लक्षणीय ठरली. या सोहळ्याला सुनील जी कोळसे, अशोक जी दिवे, सलिम जी शेख, नवनीत जी जोशी, मनोज जी लबडे, शिवाजी शिनारे, गणेश जी बोंबले यांच्यासह इतर दलित, मराठा आणि मुस्लिम बांधव तसेच महासंघाचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले.

 होते. या सर्वसमावेशक उपस्थितीमुळे शहरात एकतेचा आणि सामाजिक सलोख्याचा अतिशय सुंदर संदेश गेला.
दुग्धाभिषेक आणि अभिवादन सोहळ्यानंतर महासंघाचे संस्थापक डॉ. कृषीराज टकले पाटील यांनी उपस्थित जनसमुदायाला आणि कार्यकर्त्यांना अत्यंत अभ्यासपूर्ण व मार्गदर्शक असे संबोधन केले. आपल्या व्याख्यानातून त्यांनी शिवकालीन इतिहास, शिवरायांचे सामाजिक धोरण आणि आजच्या काळात शिवविचारांची असलेली गरज यावर प्रकाश टाकला. महासंघाच्या वतीने आगामी काळात सामाजिक एकतेसाठी आणि समाजाच्या हक्कासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही त्यांनी दिली. सर्व जाती-धर्माच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आणि एकमेकांच्या हातात हात घालून सामाजिक कार्यात पुढे जाण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. महासंघाचा स्थापना दिन आणि शिवराज्याभिषेक सोहळा अशा दोन्ही उत्सवांनी श्रीरामपूरकरांमध्ये एक नवा उत्साह आणि ऊर्जा निर्माण केली असून, हा सोहळा अत्यंत शिस्तबद्ध व उत्साही वातावरणात संपन्न झाला.