अहिल्यानगर, प्रतिनिधी : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत मेघराज राजे भोसले यांनी दणदणीत विजय मिळविल्याने राज्यभरातील कलावंतांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत असून, अभिनेता-दिग्दर्शक तथा अपंग सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष आणि दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष प्रमोद पंडीत यांनी मेघराज राजे भोसले व सर्व विजयी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.
यावेळी बोलताना प्रमोद पंडीत म्हणाले की, "हा विजय केवळ एका पॅनलचा नसून मराठी चित्रपटसृष्टीतील कलावंतांनी दाखविलेल्या विश्वासाचा, एकजुटीचा आणि सकारात्मक विचारांचा विजय आहे. कलावंतांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि संस्थेच्या उज्ज्वल भविष्यासाठी मेघराज राजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे."
मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि विविध क्षेत्रांतील कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. निवडणुकीच्या निकालानंतर अनेक कलावंतांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तसेच प्रत्यक्ष भेटून विजेत्यांचे अभिनंदन केले. या विजयामुळे महामंडळाच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
प्रमोद पंडीत यांनी पुढे सांगितले की, "निवडणुकीतील मतभेद आणि स्पर्धा आता मागे ठेवून सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. कारण आपली खरी ओळख कोणत्या पॅनलशी संबंधित आहोत यापेक्षा आपण सर्व कलावंत आहोत हीच आहे. संस्थेच्या प्रगतीसाठी आणि कलावंतांच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे."
मेघराज राजे भोसले यांच्या विजयामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील विविध प्रश्नांना न्याय मिळेल तसेच कलावंतांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रभावी पावले उचलली जातील, असा विश्वास अनेक कलाकारांनी व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक विजयाचा आनंद साजरा करताना सर्व कलावंतांनी एकात्मतेचा संदेश देत आगामी काळात संस्थेला अधिक सक्षम करण्याचा निर्धार व्यक्त केला.
0 Comments