दिलीप शिंदे
सोयगाव दि. २०-- पशुसंवर्धन विभाग, छत्रपती संभाजीनगर यांच्या अंतर्गत तालुका पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, सोयगाव यांच्या वतीने क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचलित अंजनाई गोशाळा, आमखेडा (ता. सोयगाव) येथे सर्व गोवंशीय जनावरांना लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले.
लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात आलेल्या या विशेष लसीकरण मोहिमेत गोशाळेतील सर्व गायींचे नियोजनबद्ध पद्धतीने लसीकरण करण्यात आले. या मोहिमेसाठी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. उत्तम गुट्टे तसेच पशुधन पर्यवेक्षक तथा फिरते पशुवैद्यकीय दवाखाना वाहन चालक निलेश खोडके, गोशाळा कर्मचारी अनिल लोखंडे व ज्ञानेश्वर जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी अंजनाई गोशाळेचे अध्यक्ष संदीप इंगळे यांनी पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच परिसरातील सर्व पशुपालकांनी आपल्या गोवंशीय जनावरांचे लम्पी चर्मरोगापासून संरक्षण करण्यासाठी वेळेत लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान, तालुक्यातील सर्व पशुपालकांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या लम्पी चर्मरोग प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा व आपल्या पशुधनाचे संरक्षण करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. उत्तम गुट्टे, डॉ. शरद पवार आणि डॉ. दानिश बुखारी यांनी संयुक्तपणे केले आहे.
0 Comments