डॉ. शरद दुधाट यांचे श्रमसाफल्य आत्मकथन प्रेरणादायी: डॉ. विकास आमटे

लोहगाव ( वार्ताहर)
 
डॉ. शरद दुधाट यांचे श्रमसाफल्य हे आत्मकथन जीवन जगण्याची, समर्पित सेवा, निष्ठा आणि प्रेरणेची खरी समृद्धी दर्शविते. श्रमातूनच माणसाची आणि समाजाची जडणघडण होत असते. श्रमसाफल्य हे आत्मकथन आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी असल्याची भावना डॉ. विकास आमटे यांनी व्यक्त केली. 
श्रीरामपूर येथील डॉ. शरद दुधाट यांच्या श्रमसाफल्य आत्मकथनाचे प्रकाशन महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे यांचे हस्ते नुकतेच आनंदवनात संपन्न झाले. श्रीरामपूर येथील विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित पुरस्कार व प्रकाशन समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉ. विकास आमटे, डॉ. भारतीताई आमटे, डॉ. शरद दुधाट, आदिनाथ जोशी व रमेश ठाकूर हे होते तर अध्यक्ष संस्थापक सचिव सुखदेव सुकळे हे होते. यावेळी महामानव डॉ. बाबा आमटे, साधनाताई आमटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन केले. आनंदवनच्या कार्यकर्त्या शशिकलाताई रावसाहेब शिंदे व डॉ. शरद दुधाट यांचे मेहुणे अशोक लबडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत सुखदेव सुकळे यांनी केले. याप्रसंगी आनंदवनच्या वर्धा येथील विसावा प्रकल्पाचे प्रमुख उमेश ठाकूर यांना विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठानच्या वतीने ॲड. रावसाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. मानपत्राचे वाचन रविकांत घोलप यांनी केले. यावेळी प्रवरानगर येथील महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शरद दुधाट यांच्या श्रमसाफल्य या आत्मकथनाचे प्रकाशन डॉ. विकास आमटे यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी सुखदेव सुकळे, आदिनाथ जोशी, डॉ. शरद दुधाट, विश्वस्त सुधाकर कडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. विकास आमटे यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, श्रमसाफल्य हे जीवनातील श्रमाचे आणि त्यातून मिळालेल्या यशाचे एक प्रामाणिक चित्रण आहे. सामाजिक, शैक्षणिक सेवेत समर्पित डॉ. शरद दुधाट यांचे हे आत्मकथन तरुणपिढीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. उमेश ठाकुर यांचे सेवाकार्य आनंदनातील पिढीसाठी समर्पित आहे. सेवेचा वसा घेतलेल्या ठाकूर यांची सेवा आनंदवनवासीयांच्या कायम स्मरणात राहील. विश्वलक्ष्मी ग्रामीण प्रतिष्ठांचे सुखदेव सुकळे यांचे हे सेवाभावी कार्य आनंदवन कधी विसरू शकत नाही. याप्रसंगी डॉ. विजय पोळ, माधव कवीश्वर, राजेश ताजणे, सविता दुधाट, हर्षाली दुधाट, चंद्रकांत घाडगे, ऐश्वर्या घाडगे, शितल बुरकुले यांच्यासह आनंदवन हॉस्पिटलमधील आरोग्य सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन दीपक शिव यांनी केले तर आभार संकेत बुरकुले यांनी मानले.

Post a Comment

0 Comments