दिलीप शिंदे
सोयगाव दि.११-- मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ७५१.८९ लक्ष रुपये निधी मंजूर करण्यात आला होता. मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम युनायटेड कन्स्ट्रक्शन छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
हस्तांतरित करण्यापूर्वीच इमारतीला तडे पडले असून छताचे प्लास्टर ही कोसळले आहे.भरघोस निधी असतांना देखील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या झालेल्या बांधकामावर नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे असलेले शासकीय विश्रामगृहाची इमारत पाडून या ठिकाणी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यासाठी शासनाकडून ७५१.८९ लक्ष असा भरघोस निधी मंजूर करण्यात आला होता. युनायटेड कन्स्ट्रक्शन छत्रपती यांचा करारनामा क्रमांक ब १/ ११६३, कार्यारंभ आदेश दिनांक १० मार्च २०२३,काम पूर्णत्वाचा दिनांक ०९ मार्च २०२५ असा २४ महिन्यांचा कालावधी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्याचा ठेका देण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभाग फर्दापूर यांच्या देखरेखीखाली मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम करण्यात आले. सुरुवातीपासूनच या इमारतीच्या बांधकामाविषयी प्रश्न निर्माण झाले होते.वाळूचा वावर न करता खडीचा बारीक फफुट्याचा वापर करण्यात आला होता.राजकीय वरदहस्त यामुळे इमारतीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे.मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन अंदाजे वर्ष झाले आहे. मध्यवर्ती प्रशासकीय इमारत हस्तांतरणापूर्वीच इमारतीला बाहेरून व आतून मोठमोठे तडे गेले आहे. काही ठिकाणी छताचे प्लास्टर पडलेले असून भिंतीला लावण्यात आलेल्या स्टाईल पण निघण्याच्या स्थितीत असून इमारतीच्या बांधकामावर नागरिकांमधून प्रश्न उपस्थित केला जात आहे. ठेकेदारासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारत बांधकामांची देखरेख करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
0 Comments