सावळीविहीर बुद्रुक गावामध्ये श्री महादेव मंदिरामध्ये जुने शिवलिंग होते. परंतु ते नैसर्गिक रित्या भग्न झाल्यामुळे ते विधिवत पूजन करून काढण्यात आले.व विधिवत गोदावरी नदीत विसर्जन करण्यात आले. तत्पूर्वी ग्रामस्थ व शिवभक्तांच्या वतीने आणलेल्या नवीन शिवलिंगाची सजवलेल्या रथातून टाळ मृदंगाच्या निनादात व शंभू महादेवांचा जय जयकार करत गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीनंतर नवीन शिवलिंगाचा मंत्रोपचारात जलाभिषेक करण्यात येऊन संत जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत परमपूज्य रमेश गिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. काही काळ नवीन मूर्ती धान्यामध्ये ठेवण्यात आली. तसेच मंदिर सभा मंडपात सौ.व श्री संतोष पळसे, सौ व श्री रवींद्र पळसे, सौ व श्री प्रताप कापसे, सौ.व श्री साई सुनिल जपे, सौ.व श्री अक्षय सुनील आगलावे या पाच जोड्यांच्या हस्ते होम हवन व पूजन करण्यात आले. निफाड उगाव येथील अविनाश पंगे गुरुजी व इतर ब्राह्मण वृंदांच्या मंत्रोपचारात नवग्रह मंडल, वर्धनी मंडल,क्षेत्रपाल मंडल, योगिनी मंडल, वास्तुमंडल, मातृकामंडल, ब्रह्म मंडल, आदींची पूजा करण्यात आली. तसेच नवीन शिवलिंगाची पूजा, आरती केल्यानंतर मंदिरामध्ये विधिवत स्थापना करण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला पुरुष युवक शिवभक्त, भजनी मंडळ, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवीन शिवलिंगाच्या स्थापने निमित्त मंदिराला रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
0 Comments