साहित्यातून जीवन प्रवासाच्या मार्गाचा खरा अर्थ उकलतो-डॉ. सुवर्णाताई चव्हाण (अध्यक्ष- मराठी अभ्यास मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर



टाकळीभान प्रतिनिधी: मराठी ग्रामीण साहित्य संमेलनातून, व्यक्ती चरित्र घडते तसेच साहित्यातून आपल्या जीवन प्रवास मार्गातील विविध पैलूंचा अर्थ उलगडतो असे प्रतिपादन ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्था टाकळीभानच्या वतीने आयोजित चौथे राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन व उत्कृष्ट मराठी अध्यापन साहित्य सेवा पुरस्कार कार्यक्रम प्रसंगी संमेलनाध्यक्षा डॉ. सुवर्णाताई चव्हाण/गुंड यांनी केले.

 याप्रसंगी व्यासपीठावर संमेलनाचे उद्घाटक डॉ. राजन लाखे, प्रमुख पाहुणे (स. अध्यक्ष) मराठी साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ, संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश कुलथे, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्ये, जल अभ्यासक भिला सोनू पाटील,ज्येष्ठ साहित्यिक संजय पवार, ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त ह. भ. प. माऊली शिंदे, ज्येष्ठ ग्रामीण कवी पोपटराव पटारे, प्रा. डॉ. अनिल लोखंडे सर, ज्येष्ठ मराठी अध्यापक केरुजी आभाळे, प्रा. विजय बोर्डे
प्राचार्य टी.ई. शेळके, शिवसेनेचे जिल्हा संघटक दादासाहेब कोकणे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, प्रा.कार्लस साठे, मा. चेअरमन एकनाथ पटारे, प्रा. शिवाजीराव बारगळ सर,बाळासाहेब कोकणे,श्रीधर गाडे, आदी मान्यवर उपस्थित होते. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत संमेलनाचे स्वागताध्यक्ष प्रकाश कुलथे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्जुन राऊत यांनी केले.तर प्रा. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी परिसंवादामध्ये सहभाग घेऊन मनोगत व्यक्त केले.ते म्हणाले की
  चौथे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन आयोजित करून ज्ञानज्योती बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष अर्जुन राऊत यांनी टाकळीभान गावाचा सन्मान वाढविला आहे. अनेक नवोदित ग्रामीण साहित्यिकांच्या पंखात बळ भरणारे हे ग्रामीण साहित्य संमेलन असून समाजातील गुणशील,सेवाभावी,उपक्रमशील, संशोधक, शिक्षणतपस्वी यांची प्रतिष्ठा वाढविणारे आहे, त्यांच्या सन्मानाबद्दल अर्जुन राऊत यांच्या सेवाभावी कार्याचा गौरव झाला पाहिजे.
     यावेळी मान्यवरांच्या हस्ते जल अभ्यासक भिला सोनू पाटील यांचे लिखित ' गावपण' या ग्रामीण जीवनावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 
   याप्रसंगी कार्यक्रमामध्ये मराठी भाषेची सेवा देणाऱ्या उत्कृष्ट मराठी अध्यापकांचा व साहित्यात योगदान देणाऱ्या साहित्यिकांचा पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.तसेच सामाजिक, शैक्षणिक, आदर्श कुटुंब, आदर्श सरपंच, या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचाही पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. तसेच चिंचवड (पुणे) येथील साहित्य परिषदेचे संस्थापक ज्येष्ठ सदस्य प्रा. संजय पवार यांना मान्यवरांच्या हस्ते 'साहित्य सेवा जीवन गौरव ' सन्मानित करण्यात आले.
             यावेळी संमेलनाध्यक्षा डॉ. चव्हाण /गुंड बोलताना पुढे म्हणाल्या की आजच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपली नवी पिढी मराठी भाषेपासून काहीशी दुरावतेय की काय, अशी भीती अनेकदा व्यक्त केली जाते. मराठी भाषेचा प्रवास हा केवळ शब्दांचा प्रवास नसून तो आपल्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि संघर्षाचा इतिहास आहे.
            आजच्या तरुण पिढीला मला हेच सांगायचे आहे की, मराठी ही केवळ संवादाची भाषा नाही, तर ती ज्ञानाची भाषा आहे. ज्ञानेश्वरांच्या 'अमृतानुभवा पासून ते आधुनिक साहित्यापर्यंत मराठीने नेहमीच प्रगल्भ विचार दिले आहेत.
             जागतिकीकरणाच्या प्रवाहात इंग्रजी किंवा इतर भाषा शिकणे काळाची गरज असली, तरी आपली 'मायबोली' विसरून चालणार नाही. ज्याप्रमाणे झाडाची मुळे जमिनीत खोलवर असतील तरच ते झाड आकाशाला गवसणी घालू शकते, त्याचप्रमाणे आपली भाषिक मुळे घट्ट असतील तरच आपण जागतिक स्तरावर आत्मविश्वासाने वावरू शकू.
 आज मराठी भाषा बदलत आहे, तिच्यात नवनवीन शब्द येत आहेत, ही तिची 'गती' आहे. पण तिचे मूळ सौंदर्य जपणे ही आपली जबाबदारी आहे. 
         मराठी भाषेचा हा देदीप्यमान वारसा नव्या पिढीने अभिमानाने स्वीकारावा आणि संवर्धित करावा, हीच आजच्या काळाची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. 
             कार्यक्रम प्रसंगी कवि संमेलनाची अध्यक्षपदाची धुरा राहुरी विद्यापीठ येथे सेवेत असलेले महावीर सिंग चव्हाण यांनी सांभाळली. दुसऱ्या सत्रात कवि संमेलन पार पडले यामध्ये ग्रामीण कवी आनंदा साळवे, रज्जाक शेख सर, बाळासाहेब मुन्तोंडे , आत्माराम शेवाळे, बाळासाहेब कोठुळे, ह भ प कानवडे महाराज, या निमंत्रित कवी सह उपस्थित कवींनी त्यामध्ये सहभाग घेतला. उत्कृष्ट काव्य सादर केल्याबद्दल संस्थेच्या वतीने कवींना सन्मानचिन्ह व सहभाग प्रमाणपत्र वितरित करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या संमेलनामध्ये युवा साहित्यिकांनीही सहभाग घेतला संस्थेच्या वतीने त्यांचाही गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी, बंडोपंत बोडखे, काकासाहेब डिके, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, अशोकराव रणनवरे, खंडेराव गवांदे सर, मच्छिंद्र पटारे, बापूसाहेब माने,मधुकर गायकवाड, आदी सह गावातील मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन राऊत, उपाध्यक्ष संदीप पटारे ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते भैय्या पठाण, धावपटू भाऊसाहेब गव्हाणे, सुजित बोडखे, रामेश्वर शिंदे, सुदाम पटारे, दिगंबर मगर,रवी पटारे, शिक्षिका जयश्री वाडेकर तसेच संस्थेच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन बापूसाहेब तनपुरे यांनी केले.सर्वांचे आभार उपाध्यक्ष संदीप पटारे यांनी मानले.
साहित्यातून जीवन प्रवासाच्या मार्गाचा खरा अर्थ उकलतो-डॉ. सुवर्णाताई चव्हाण (अध्यक्ष- मराठी अभ्यास मंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर

Post a Comment

0 Comments