स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण संघटना' अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदी गोपाळ राऊत यांची निवड;

साबळे ज्ञानेश्वर सहसंपादक 


लोणी: राहता तालुक्यातील सामाजिक आणि संघटनात्मक घडामोडींना एक नवी दिशा देणारी आणि समाज प्रबोधनाचा नवा संदेश देणारी एक अत्यंत महत्त्वाची बैठक नुकतीच उत्साहात पार पडली. 'स्वराज्य पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण संघटना' यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष बैठकीमध्ये संघटनेच्या आगामी ध्येय-धोरणांवर आणि विस्तार योजनांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीला उपस्थित असलेल्या सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अत्यंत एकजुटीने आणि ताकदीने संघटनेच्या आगामी कामकाज व कार्यप्रणालीमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला. या नव्या ऊर्जेमुळे संघटनेच्या कार्याला जिल्हाभरात अधिक बळ मिळणार असल्याचे यावेळी सर्वानुमते स्पष्ट करण्यात आले.

याच महत्त्वपूर्ण बैठकीचे औचित्य साधून संघटनेच्या अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्षपदाची मोठी जबाबदारी गोपाळ राऊत यांच्यावर सोपवण्यात आली असून त्यांची या पदावर सर्वानुमते निवड करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी संघटनेचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष उमेश पन्हाळे, राहता तालुका कार्याध्यक्ष (आबा ) संपत निर्मळ, राहता तालुका अध्यक्ष रुपाली भालेराव, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे, तसेच मुख्य कार्यकारिणी सदस्य- श्रीपाद बोकंद आणि सदस्य - राजेंद्र पिंपळ, प्रथमेश महाले आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. नवनियुक्त जिल्हा कार्याध्यक्ष गोपाळ राऊत यांच्या निवडीचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष सतीश मनतोडे सर यांच्या विशेष उपस्थितीत त्यांचा संघटनेच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्वच मान्यवरांनी गोपाळ राऊत यांचा पुष्पगुच्छ देतसत्कार करून त्यांच्या भावी सामाजिक आणि संघटनात्मक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे दुसरे सर्वात मुख्य आकर्षण म्हणजे समाज प्रबोधनाचा संदेश देणाऱ्या एका नव्या कलाकृतीचे झालेले स्वागत. अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'भोंदूची कमाल, पोलिसांची धमाल' या लघुपटाच्या आकर्षक पोस्टरचे अनावरण उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते अत्यंत दिमाखदार पद्धतीने करण्यात आले. समाजातील ज्वलंत आणि अतिशय संवेदनशील प्रश्नांवर प्रकाश टाकण्यासाठी तसेच सर्वसामान्य जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी निर्माते आबा निर्मळ आणि दिग्दर्शक प्रमोद निर्मळ यांनी या दर्जेदार लघुपटाची निर्मिती केली असून, हा लघुपट आता प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
पोस्टर अनावरणानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हाध्यक्ष सतीश मनतोडे सर यांनी उपस्थितांना संबोधित करताना आपले अभ्यासपूर्ण मनोगत व्यक्त केले. आजच्या आधुनिक काळातील सामाजिक सद्यस्थितीवर बोट ठेवत ते म्हणाले की, माणसाच्या जीवनात कौटुंबिक, आर्थिक किंवा वैयक्तिक स्वरूपाच्या वेगवेगळ्या अडचणी आणि समस्या सतत येतच असतात. परंतु, दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या अडचणींमधून तात्पुरता किंवा कोणताही अंधश्रद्धेचा मार्ग काढण्यासाठी समाजातील सुशिक्षित वर्ग देखील आजकाल मोठ्या प्रमाणावर भोंदू बाबांच्या आणि जादूटोण्याच्या आहारी जात आहे. आज संपूर्ण जग विज्ञान आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर नवनवीन शिखरे पादाक्रांत करत असताना, दुसरीकडे आपल्याच समाजातील सुशिक्षित नागरिक अशा भोंदुबाबांच्या जाळ्यात अडकतात ही गोष्ट अत्यंत खेदजनक आणि चिंताजनक आहे. या लघुपटाच्या माध्यमातून समाजाने कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला आणि भोंदूगिरीला बळी न पडता, कठीण परिस्थितीमध्ये सकारात्मक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. या विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित सर्व कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांना सतीश मनतोडे सर यांचे अतिशय मोलाचे व मार्गदर्शक विचार ऐकण्याची संधी मिळाली.

Post a Comment

0 Comments