टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर शहरालगत असलेल्या एमआयडीसी परिसरातील रेल्वे ट्रॅकवर एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीसह तिचा २६ वर्षांचा प्रियकर यांनी रेल्वेखाली आत्महत्या करण्याची खळबळजनक घटना काल रविवारी पहाटे घडली आहे.
काल रविवारी पहाटे एमआयडीसीजवळ असलेल्या यादव बाबा मंदिराजवळील रेल्वे ट्रॅकवर एक स्त्री व एक पुरूष जातीचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत मिळून आले. त्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी पंचनामा केला. नंतर पोलिसांनी केलेल्या तपासात समजलेली अधिक माहिती अशी की, सदर १७ वर्षांची तरूणी ही श्रीरामपूर शहरात मध्यवस्तीत राहते. सदर मुलगी हिचे सहा महिन्यांपासून २६ वर्षीय संजयनगर परिसरातील एका तरूणाबरोबर प्रेमसंबंध होते. महिनाभरापूर्वी या मुलीच्या घरच्यांना तिच्याकडे मोबाईल फोन आढळून आला. त्यातून मुलीचे प्रेमसंबंध असल्याची माहिती घरच्यांना समजली. तेव्हा त्यांनी मुलीकडून मोबाईल फोन काढून घेतला आणि तिला नाशिक जिल्हयात नातेवाईकांकडे पाठवले. तेव्हापासून मुलगी नाशिक जिल्हयात होती. ८ दिवसांपूर्वी सदर मुलगी ही नाशिक येथून श्रीरामपूरला आली होती. शनिवार दि. २ मे रोजी घरच्यांना पुन्हा या मुलीकडे मोबाईल फोन आढळून आला. त्यामुळे तिचे वडील तिच्यावर प्रचंड रागवले होते. त्यांनी रागारागात तिच्याकडून मोबाईल फोन काढून घेतला. तेव्हा मुलगी रागातच घरातून निघून गेली. त्याचवेळी सदर संजयनगर परिसरात राहणारा २६ वर्षीय तरूणही आपल्या घरातून निघून गेला होता. या दोघांच्याही घरचे त्यांना शोधत होते. त्यानंतर काल रविवारी पहाटे या दोघांचे मृतदेह रेल्वे ट्रॅकवर छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. या दोघांनी 'एक दुजे के लिए' आत्महत्या के ल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
0 Comments