टाकळीभान प्रतिनिधी-एकल माता असलेल्या विद्यार्थ्यांना महिला व बालविकास विभागाच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभमिळवून देण्यासाठी आता शाळांमध्येच विद्यार्थ्यांचे अर्ज भरून घेतले जाणार आहेत.
श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य शासकीय समितीची बैठक महसूल अधिकारी अभया राजवळ यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे यांनी ही माहिती दिली. समितीच्या सदस्य सचिव तथा प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे यांनी प्रारंभी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन केले. यावेळी अशासकीय सदस्य बाळासाहेब जपे, अर्जुन राऊत, तालुका संरक्षण अधिकारी दीपाली भिसे, श्रीरामपूर नगरपालिकेचे समुदाय संघटक हरीष पैठणे, गटशिक्षणाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी इरफान शेख, पंचायत समितीच्या उमेद विभागाचे अशोक रामकरवाल उपस्थित होते. मात्र, या बैठकीला गटविकास अधिकारी, पोलीस, आरोग्य, तालुका विधी सेवा प्राधिकरण, कृषी विभाग या शासकीय विभागांचे अधिकारी गैरहजर होते. सतत तीन बैठकांपासून प्रमुख अधिकारी एकल महिलांसाठी असलेल्या या महत्त्वाच्या समितीच्या बैठकांना गैरहजर राहत आहेत. अशा अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावून गैरहजेरीबाबत जाब विचारला पाहिजे, असे साळवे यांनी
सांगितले.शाळांना नुकत्याच सुट्टया लागलेल्या आहेत. शाळांमधील पात्र विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ मिळण्यासाठी एकलमाता असलेल्या विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंदवही ठेवण्याचे आदेश शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. त्यानुसार शाळा पातळीवर अशा पात्र विद्यार्थ्यांना योजनेचा लाभमिळवून देण्यासाठी शाळेतूनच त्यांचे योजनेचे प्रस्ताव, अर्ज भरून घेण्याचे आदेश शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिले आहेत. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील शाळांनी कार्यवाही करण्याबाबत गटशिक्षणाधिकारी कार्यालयाने लक्ष दिले पाहिजे, असे मिलिंदकुमार साळवे यांनी
सांगितले.शिधापत्रिकेपासून वंचित असलेल्या एकल महिलांना शिधापत्रिका देण्याबाबत बाळासाहेब जपे व अर्जुन राऊत यांनी लक्ष वेधले. त्याची दखल घेत सभाध्यक्ष राजवळ यांनी पुरवठा विभागाचे अधिकारी एस.ए.पुजारी यांना याबाबत सूचना दिल्या. तालुक्यात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी केलेल्या सर्वेक्षणात ८८४ एकल महिलांच्या शिधापत्रिकेबाबत अडचणी समोर आल्याचे बालविकास प्रकल्पाधिकारी शिंदे यांनी सांगितले.
या महिलांची यादी गाव पातळीवर देऊन त्यांच्या अडचणी सोडविणार असल्याचे राजवळ यांनी स्पष्ट केले.
चौकट-
शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन -
गाव पातळीवरील विविध शासकीय अडचणी, प्रश्न, समस्या, योजना, शासकीय दाखले यांच्याशी निगडित अडचणी सोडविण्यासाठी तहसील कार्यालयाच्यावतीने सकाळी १० ते ५ वाजेदरम्यान दि. ८ मे रोजी उत्सव मंगल कार्यालय व दि. १५ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा एकल महिलांसह नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मिलिंदकुमार वाघ, महसूल अधिकारी अभया राजवाळ यांनी केले आहे.
0 Comments