ग्रामीण आरोग्यसेवेची खरी ताकद शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यात - संजय किर्लोस्करपद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची दूरदृष्टी आजही प्रेरणादायी प्रवरा अभिमत विद्यापीठाचा २० वा पदवीप्रदान सोहळा; ३२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान



राजुरी (वार्ताहर) — ग्रामीण भारतात दर्जेदार शिक्षण आणि आरोग्यसेवा पोहोचवून असंख्य कुटुंबांचे जीवन बदलणारे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांची दूरदृष्टी आजही प्रेरणादायी आहे. लोणी व किर्लोस्करवाडी हे महाराष्ट्राच्या विकासाच्या नकाशावर दिसणारे छोटे पण लक्षणीय व लक्षवेधी अशी ठीपके आहेत, ही बाब कौतुकास्पद आहे. मजबूत व निरोगी आरोग्य सेवा ही राष्ट्र उभारणीच्या कार्यातील सर्वात मजबूत स्तंभापैकी एक आहे. रुग्णालये ही केवळ इमारती नसून आशेची किरणे जागवणारी केंद्रे आहेत. आरोग्यसेवेची खरी मोजदाद शहरांमध्ये कशा व किती प्रमाणात सुविधा उपलब्ध आहेत यावर ठरत नसून ती सेवा समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत किती प्रभावीपणे पोहोचते यावर ठरते, असे प्रतिपादन किर्लोस्कर ब्रदर्स लि.चे अध्यक्ष संजय किर्लोस्कर यांनी केले. 
प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या अभिमत विद्यापीठाच्या २० व्या पदवीप्रदान समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. सुरेश गोसावी उपस्थित होते. समारंभाला कुलगुरू डॉ. विष्णू मगरे, विश्वस्त सौ. सुवर्णाताई विखे पाटील, विश्वस्त सौ. मोनिका सावंत, विश्वस्त ध्रुव विखे पाटील, विश्वासराव आहेर, एम.एम.पुलाटे, स्वप्नील सावंत, पंजाबराव आहेर, कुलसचिव डॉ. रवींद्र लावरे तसेच विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते.
संजय किर्लोस्कर पुढे म्हणाले, भारताला खऱ्या अर्थाने प्रगती करायची असेल तर गावं, निरोगी, सक्षम आणि सुरक्षित असणे आवश्यक आहे. वैद्यकीय सेवा देणे हे केवळ करिअर नसून ते मानवसेवेचे ईश्वरीय कार्य आहे. पदवी तुम्हाला व्यवसाय देईल; मात्र करुणा तुम्हाला जीवनाचा उद्देश देईल. तरुण डॉक्टरांना उद्देशून त्यांनी सांगितले, तुम्ही दिलेली औषधे लोक विसरतील; पण तुम्ही त्यांच्याशी कसे वागलात हे ते कधीच विसरणार नाहीत. आपल्या कारकिर्दीतील काही काळ डॉक्टरांनी ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवेसाठी द्यावा. कारण तेथे तुमचे योगदान मोठा बदल घडवू शकते.
विशेष अतिथी डॉ. सुरेश गोसावी म्हणाले, वैद्यकीय पदवी ही केवळ व्यवसायात प्रवेश मिळवून देणारे साधन नसून मानवतेप्रती अर्पण केलेली आयुष्यभराची बांधिलकी आहे. आधुनिक ज्ञानासोबत रुग्णसेवेतील कौशल्य आणि उच्च नैतिक मूल्ये वैद्यकीय क्षेत्रात अत्यावश्यक आहेत.
कुलपती डॉ. राजेंद्र विखे म्हणाले की, विद्यापीठाकडून पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या कार्यपरंपरेतून विद्यार्थ्यांमध्ये सेवा, प्रेम आणि करुणेची मूल्ये रुजविण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात आहे. कोविडनंतरच्या जागतिक आरोग्य क्षेत्रातील आव्हाने आणि संधी यांचा सामना करण्यासाठी तरुण पदवीधर सक्षमपणे पुढे येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि अहवाल वाचन विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. डॉ. विष्णू मगरे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. दिपीका भालेराव यांनी केले. समारंभात विविध शाखांतील एकूण ३२२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments