जलसंधारण, वृक्षलागवड आणि नैसर्गिक संसाधनाचा करा योग्य वापर !नाहीतर निसर्गही करेल काटकसर---महंत आत्माराम गिरीजी महाराज

शिर्डी ( प्रतिनिधी)- 
देशभरात सध्या “काटकसर” हा शब्द केवळ आर्थिक बाबींमध्येच नाही, तर जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे. पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यांसारख्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिक आधीच बचतीच्या मार्गावर चालू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर आता निसर्गही जणू काही काटकसरीचा इशारा देत असल्याची चर्चा रंगू लागली आहे.

नर्मदेश्वर सेवाधामचे महंत, संन्यासी आत्माराम गिरी महाराज यांनी यंदाच्या पावसाळ्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. निसर्गाच्या बदलत्या संकेताकडे प्रत्येकाने दुर्लक्ष न करता जबाबदारीने वागणे आणि संसाधनाची जपणूक करणे ही काळाची गरज असल्याचे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे. महंत संन्याशी आत्माराम गिरीजी महाराज यांनी पुढे म्हटले आहे की, देशातील सध्याची हवामानस्थिती पाहता पावसाळाही अपेक्षेपेक्षा कमी प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अलीकडेच उत्तर प्रदेशमध्ये अचानक झालेल्या अवकाळी पावसाने भीषण रूप धारण केले. या घटनेत सुमारे 111 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले असून, ही बाब अत्यंत चिंताजनक मानली जात आहे. अवकाळी पावसाचे असे अनियंत्रित स्वरूप शेती, जनजीवन आणि पर्यावरणासाठी धोकादायक ठरत आहे.
दुसरीकडे, महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये उन्हाळ्याची तीव्रता उच्चांक गाठताना दिसत आहे. तापमान 40 ते 45 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने उष्णतेची लाट नागरिकांना त्रस्त करत आहे. या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पावसाचे आगमन आणि त्याचे प्रमाण याबाबत अनिश्चितता वाढली आहे.
महंत आत्माराम गिरी महाराज पुढे म्हणाले की, “ज्या प्रकारे मानव काटकसरीचा अवलंब करत आहे, त्याचप्रमाणे निसर्गही काही संकेत देत आहे. जर पावसानेही काटकसर केली, तर पाणीटंचाई, शेतीचे नुकसान आणि अन्नधान्याच्या किमतीत वाढ यांसारख्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागू शकते.”
तज्ञांच्या मते, हवामान बदल आणि अनियमित ऋतूचक्र यामुळे अशा परिस्थिती निर्माण होत आहेत. त्यामुळे जलसंधारण, वृक्षलागवड आणि नैसर्गिक संसाधनांचा योग्य वापर याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे.
एकंदरीत, यंदाचा पावसाळा नेमका कसा असेल हे येणाऱ्या काही आठवड्यांत स्पष्ट होईल. मात्र, निसर्गाच्या बदलत्या संकेतांकडे दुर्लक्ष न करता प्रत्येकाने जबाबदारीने वागणे आणि संसाधनांची जपणूक करणे हीच काळाची गरज असल्याचे म्हणतात आत्माराम गिरीजी महाराज यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments