मराठी चित्रपटसृष्टीत 'श्री स्वामी समर्थ प्रचिती'चा ; सत्य घटनेवर आधारित भावनिक प्रवास लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला



 लोणी - (रूपाली भालेराव ) मराठी चित्रपटसृष्टीमध्ये सध्या एका आगळ्यावेगळ्या आणि श्रद्धेची प्रचिती देणाऱ्या चित्रपटाची मोठी चर्चा रंगली आहे. 'एनपी व्हिजन फिल्म्स' प्रस्तुत 'श्री स्वामी समर्थ प्रचिती' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटाने सोशल मीडियावर प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे. "जिथे विज्ञान थांबते, तिथे सुरू होते श्रद्धेची प्रचिती" या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवणारा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित असून तो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून आता हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीसाठी पूर्णपणे तयार झाला आहे.
या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे याची निर्मिती आणि दिग्दर्शन हे सामान्यांच्या जिद्दीतून साकार झाले आहे. निर्माते आबा निर्मळ आणि दिग्दर्शक प्रमोद निर्मळ यांनी पत्रकारांशी बोलताना अत्यंत ठामपणे सांगितले की, हा केवळ एक चित्रपट नसून तो एक जिवंत अनुभव आहे. चित्रपटगृहातून किंवा स्क्रीनसमोरून बाहेर पडताना प्रेक्षक भारावून जातील, अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू असतील आणि मनामनात श्रद्धेची एक नवी ज्योत प्रज्वलित झालेली असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. ही कथा साध्या माणसांच्या असामान्य चिकाटीची आहे. एका बाजूला पुणतांबा येथे स्वतःचे मेडिकल चालवणारे प्रमोद निर्मळ तर दुसरीकडे पुण्यातील एका खासगी कंपनीत नोकरी करणारे आबा निर्मळ या दोघांनी मिळून पाहिलेले स्वप्न आता मोठ्या पडद्यावर सत्यात उतरले आहे. कोणत्याही मोठ्या बॅनरशिवाय, केवळ स्वतःच्या मेहनतीवर आणि स्वामींच्या आशीर्वादाच्या बळावर हा चित्रपट उभा राहिला असून हाच या चित्रपटाचा खरा युएसपी ठरला आहे.
चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाने या कथेला अधिक जिवंत केले आहे. यामध्ये प्रमोद निर्मळ, ज्ञानेश्वर थोटे (नेवासा), मनीषा गुळवे, ज्ञानेश्वर साबळे, नरसिंहा टाक, वनिता निर्मळ, सुरज बी निर्मळ आणि संजय निर्मळ ऊर्फ संजू बाबा यांसारख्या अभिनयाने परिपूर्ण कलाकारांचा समावेश आहे. त्यांच्या दमदार अभिनयामुळे स्वामी समर्थांच्या कृपेची अनुभूती प्रत्येक भक्ताला येईल, अशी आध्यात्मिक अनुभूती या चित्रपटातून मिळणार आहे. श्रद्धा आणि वास्तव यांचा एक अप्रतिम मिलाफ या चित्रपटात पाहायला मिळणार असून मराठी चित्रपटाला नवी दिशा देणारा हा एक प्रामाणिक प्रयत्न असल्याचे चित्रपट क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
हा चित्रपट लवकरच 'एन पी व्हिजन, फिल्म्स ' या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित केला जाणार आहे. सोशल मीडियावर या चित्रपटाबद्दल आतापासूनच सकारात्मक चर्चा सुरू असून अनेकांनी याला 'गेम चेंजर' चित्रपट म्हणून संबोधले आहे. सत्य घटनेवर आधारित थरारक कथा आणि मनाला भिडणारा भावनिक प्रवास यामुळे हा चित्रपट केवळ पाहण्यासारखा नसून तो अनुभवावा असा आहे. आपल्या मनात श्रद्धेची ज्योत प्रज्वलित करणारी ही कथा बघायला विसरू नका आणि आपल्या मित्र-परिवारासोबत आवर्जून शेअर करा, असे आवाहन टीमच्या वतीने करण्यात आले आहे. आता सर्वांचे लक्ष या भव्य मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाकडे लागले आहे.

Post a Comment

0 Comments