लोणी: - (प्रतिनिधी रूपाली निलेश भालेराव) धावपळीच्या आणि भौतिक सुखाच्या मागे लागलेल्या आजच्या धावपळीच्या युगात मानवी मनाला खरी शांती केवळ अध्यात्मातूनच मिळू शकते. अध्यात्म म्हणजे केवळ पूजा-अर्चा नसून, स्वतःचा शोध घेणे आणि सद्वर्तनाने जगणे होय," असे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांनी केले. लोणी बुद्रुक येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी कीर्तनपुष्प गुंफताना ते बोलत होते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित या सोहळ्याने सध्या संपूर्ण लोणी परिसर भक्तिमय झाला आहे.
अध्यात्माचे महत्त्व सांगताना ढोक महाराज पुढे म्हणाले की, संतांनी रचलेला ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ आपल्याला जगण्याची कला शिकवतो. भौतिक प्रगती कितीही झाली, तरी जोपर्यंत अंतर्मनात ईश्वरी नामाचा जप आणि विचारांची शुद्धता नसेल, तोपर्यंत जीवनात समाधान लाभत नाही. अध्यात्म हे माणसाला संकटात ध्येर्य देते आणि सुखात नम्र राहायला शिकवते. ज्ञानेश्वरीच्या ओव्यांमधून मिळणारा उपदेश केवळ वाचण्यासाठी नसून तो आचरणात आणण्यासाठी आहे, असेही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले. श्रीराम मंदिर प्रांगणात जमलेल्या शेकडो भाविकांनी या निरूपणाचा लाभ घेतला.
या सोहळ्याचे नियोजन लोणी बुद्रुक ग्रामस्थांच्या वतीने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले आहे. पहाटेच्या काकडा भजनापासून ते रात्रीच्या हरि कीर्तनापर्यंत सर्व कार्यक्रम वेळेत पार पडत आहेत. दुसऱ्या दिवशी दुपारी दुर्गापूर, चंद्रापूर आणि दाद येथील भजनी मंडळांनी आपल्या भजनांमधून उपस्थितांची मने जिंकली टाळ मृदंगाच्या गजरात हरी कीर्तनाचा सर्वांनी लाभ घेतला पाहिजे त्यामुळे जगण्यातही कुठेतरी सकारात्मकता येऊन संकटावर मात करता येते. हरिनामाने अवघा परिसर हरिनामाने भक्तीमय झाला आहे या सोहळ्यामुळे केवळ धार्मिक वातावरणच निर्माण झाले नसून, सामाजिक एकता आणि संस्कारांची रुजवणूक होत असल्याचे चित्र लोणीमध्ये पाहायला मिळत आहे. येत्या ५ मे पर्यंत हा ज्ञानाचा यज्ञ असाच सुरू राहणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने या अमृतवाणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
सत्तेचा महासंग्राम - लोणी प्रतिनिधी
रूपाली निलेश भालेराव.
सहसंपादक साबळे ज्ञानेश्वर.
0 Comments