राजकुमार गडकरी
शिर्डी (प्रतिनिधी)-भागवत धर्मामध्ये व्रतांना आणि महापर्वकाळांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. वारकरी संप्रदायाचा मूळ गाभा केवळ विचारांत नाही, तर तो प्रत्यक्ष आचरणात दडलेला आहे. खऱ्या वैष्णवाची ओळख सांगताना आपल्या परंपरेत एक अत्यंत महत्त्वाचा नियम सांगितला आहे. वर्षातील चोवीस एकादशींचे व्रत तर प्रत्येक वारकरी प्राणपणाने पाळतोच, पण त्यासोबतच काही 'महापर्वकाळ' देखील तितकेच वंदनीय मानले आहेत. शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज 'श्रीएकनाथी भागवता'त या पर्वकाळांचा महिमा सांगताना अतिशय स्पष्ट शब्दांत म्हणतात:
*"पर्व विशेष भागवधर्मी | नृसिंहजयंती रामनवमी | वामनजयंती जन्माष्टमी | उत्तमोत्तमी शिवरात्री ||"*
या वचनानुसार रामनवमी, नृसिंह जयंती, वामन जयंती, श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि महाशिवरात्री हे पाच सर्वोच्च पर्वकाळ आहेत. जो साधक वर्षातील २४ एकादशी आणि हे ५ महापर्वकाळ असे एकूण २९ उपवास अत्यंत निष्ठेने आणि श्रद्धेने करतो, तोच खरा वैष्णव! या २९ आकड्यामध्येच वैष्णव शब्दाचे खरे मर्म दडलेले आहे. 'वीस (२०) + नव (९) = वैष्णव' ही किती मार्मिक शब्दरचना आहे! जो हे 'वीस' आणि 'नव' मिळून 'एकोणतीस' उपवास प्राणपणाने पाळतो, तोच खरा वैष्णव. असे म्हटले जाते. असे ह भ प संजयजी महाराज जगताप यांनी सांगितले.
त्यांनी पुढे म्हटले की,आज गुरुवार वैशाख शुद्ध चतुर्दशी, म्हणजेच साक्षात भगवान श्री नृसिंहांचा प्रगटीकरण दिन; हा तोच महापर्वकाळ आहे. त्यामुळे आज सर्वांनी एकादशीप्रमाणेच श्रद्धेने उपवास करून या मंगल पर्वाचे आचरण करणे, हे प्रत्येक वैष्णवाचे आद्यकर्तव्य आहे. हा दिवस केवळ एका अवताराचा किंवा असुरसंहाराचा प्रसंग नाही, तर तो मानवी आणि ईश्वरी वृत्तींच्या तीन अत्यंत भिन्न आणि टोकदार भावांचा एक अभूतपूर्व संघर्ष आहे. या कथेत एका बाजूला सत्तेने आणि वरदानाने अंध झालेला 'अहंकार' आहे, दुसऱ्या बाजूला मृत्यूसमोरही न डगमगणारी *'निस्सीम भक्ती'* आहे आणि या दोघांच्या संघर्षातून प्रगट होणारे भगवंतांचे 'अथांग वात्सल्य' आहे.
एकीकडे आहे हिरण्यकशिपूचा मदांध अहंकार आणि कट्टर देवद्वेष! ब्रह्मदेवाकडून मिळालेल्या वरदानाचा त्याला एवढा गर्व झाला होता की, तो स्वतःलाच सर्वशक्तिमान आणि अमर समजू लागला होता. त्याच्या राज्यात *'नाम घेऊ नेदी देवाचे हे बिरूद हिरण्यकश्यपूचे'* अशी दहशत होती. जेव्हा त्याने प्रल्हादाला त्याच्या हरीबद्दल विचारले, तेव्हा प्रल्हादाने भगवंताची सर्वव्यापकता सांगताना उत्तर दिले:
*न केवलं मे भवतश्च राजन् |*
*स वै बलं बलिनां चापरेषाम् ||*
(श्रीमद्भागवत ७.८.७)
अर्थ: "हे राजा, तो ईश्वर केवळ माझाच नाही, तर तो तुमचा आणि या जगातील सर्व बलवानांच्या शक्तीचे मूळ आहे. तोच चराचरात व्यापलेला आहे."
हे ऐकून अहंकारी हिरण्यकशिपू संतापाने लाल झाला. त्याने समोरच्या खांबाकडे पाहत प्रल्हादाला आव्हान दिले:
*स्तम्भे घटस्व न तथा न च कुड्यके वा |*
*क्व असौ यदि स सर्वत्र कस्मात् स्तम्भे न दृश्यते ||*
(श्रीमद्भागवत ७.८.१२)
अर्थ: "जर तुझा हरी सर्वत्र आहे, तर तो या खांबात का दिसत नाही? जर तो यात नसेल, तर आज मी तुझे मस्तक धडावेगळे करतो."
अशा या मदांध अहंकाराच्या आणि मृत्यूच्या गडद अंधारातच उदेला प्रल्हादाच्या भक्तीचा तेजस्वी सूर्य! मृत्यू समोर उभा असतानाही ज्याचा देवावरचा विश्वास अढळ राहिला, त्या भक्ताचा शब्द सत्य करण्यासाठी साक्षात जगन्नियंत्याला त्या निर्जीव खांबातून प्रकट व्हावे लागले. भगवंतांच्या या प्रकटीकरणाचे प्रयोजन सांगताना भागवतकार म्हणतात:
*सत्यं विधातुं निजभृत्यभाषितं | व्याप्तिं च भूतेषु अखिलेषु चात्मनः ||*
(श्रीमद्भागवत ७.८.१८)
अर्थ: "आपल्या सेवकाचे (प्रल्हादाचे) बोलणे सत्य करण्यासाठी आणि स्वतःची व्याप्ती सर्व चराचर सृष्टीत आहे हे सिद्ध करण्यासाठी भगवंत त्या खांबातून प्रकट झाले."
धर्माच्या रक्षणासाठी धारण केलेले ते नरहरीचे उग्र आणि रौद्र रूप एवढे भयंकर होते की, प्रत्यक्ष लक्ष्मीमाताही जवळ जाण्यास घाबरली. पण या प्रसंगातील सर्वात विलोभनीय आणि काळजाला भिडणारा भाव कोणता असेल, तर तो म्हणजे उग्रतेवर मात करणारे भगवंतांचे अथांग वात्सल्य! साऱ्या ब्रह्मांडात धडकी भरवणारा तो नृसिंह, जेव्हा पाच वर्षांचा चिमुकला प्रल्हाद हात जोडून निर्भयपणे समोर आला, तेव्हा एका क्षणात शांत झाला. ज्या क्रोधाने आणि कठोर हातांनी एका क्षणापूर्वी दैत्याला फाडले होते, त्याच हातांनी अत्यंत हळुवारपणे प्रल्हादाला उचलून मांडीवर घेतले. भक्तीच्या एका निष्पाप आणि निरागस स्पर्शाने कठोर वज्राचे रूपांतर लोण्याहून मऊ अशा मातेच्या वात्सल्यात झाले.
अहंकाराचा नाश करून भक्तीचा विजय सांगणारी ही नृसिंह जयंती आपल्या सर्वांच्या अंतःकरणात तोच प्रल्हादाचा निष्पाप भाव आणि भगवंतावरील अढळ निष्ठा निर्माण करो. *आजच्या नृसिंह जयंतीच्या महापर्वकाळाला एकादशीप्रमाणेच उपवास करून आपण सर्वजण खऱ्या वैष्णव धर्माचे पालन करूया. असे सांगत
भगवान श्री नृसिंह सर्वांना सत्कार्य आणि परमार्थ करण्यासाठी बळ देवोत, हीच प्रार्थना असे हभप संजयजी महाराज जगताप यांनी म्हटले आहे.
0 Comments