सावळीविहिर बु. येथील कारवाडी भागात एक नव्हे तर चार बिबट्यांचे दर्शन! शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण!

शिर्डी (प्रतिनिधी)- राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील कारवाडी भागात गेल्या काही दिवसापासून बिबट्यांचा वावर दिसून येत असून शुक्रवारी रात्री एक नव्हे तर चार बिबटे दिसून आल्याने शेतकरी व परिसरातील रहिवाशांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे.

 शुक्रवारी रात्री सरपंच ओमेश जपे यांच्या वस्तीजवळ शेतामध्ये हे बिबटे दिसून आले आहेत. ते मोबाईलच्या कॅमेरातही कैद झाले आहेत. आतापर्यंत या बिबट्याने अनेक शेळ्या कुत्रे येथे फस्त केले आहेत. काही दिवसापूर्वी शिवाजी आगलावे यांच्या वस्तीवरील पाळलेला कुत्रा बिबट्याने पकडला होता. तेव्हापासून येथे वन विभागाने पिंजरा लावला होता .मात्र या पिंजऱ्यात हे बिबटे अद्यापही अडकले नाहीत. उलट शुक्रवारी रात्री हे बिबटे बिनधास्त जपे यांच्या वस्तीजवळील महादेवाच्या मंदिर परिसरातील शेतात इकडे तिकडे रस्त्यावर फिरताना आढळून आले आहेत.
 त्यामुळे शेतकरी व नागरिकांमध्ये आणखीनच भीती निर्माण झाली आहे. एक दोन नागरिकांवरही या बिबट्याने लांबून झडप मारण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.व त्यात हे चार छोटे मोठे बिबटे दिसून आल्याने या भीतीमध्ये आणखी वाढ झाली आहे. त्यामुळे ताबडतोब डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्याशी कार्यकर्त्यांनी संपर्क करून त्वरित येथे वन विभागाचे अधिकारी हजर झाले. या बिबट्यांच्या भीतीपायी उन्हाळा असतानाही शेतकरी रात्री शेतात पाणी देण्यास जात नाही. त्यामुळे शेत पिके ही वाळून चालले आहेत. मात्र बिबट्यांच्या भीतीपोटी रात्री कोणी बाहेर फिरकत नाही. तरी या बिबट्यांचा वन विभागाने बंदोबस्त करावा. अशी मागणी आता जोर धरत आहे.

Post a Comment

0 Comments