सावळीविहीर येथील धार्मिक वृत्तीचे कै. नवनाथ भिमराज पा.जपे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणा निमित्त सुश्राव्य कीर्तन संपन्न !

शिर्डी (राजकुमार गडकरी)-सुख व दुःख याचे मिश्रण म्हणजे संसार आहे, संसारात शंभर टक्के दुःख किंवा शंभर टक्के आनंद कोणालाच मिळत नाही, त्यामुळे या जीवनात संपूर्ण व आत्मिक आनंद मिळवण्यासाठी तसेच संपूर्ण आयुष्य गोड म्हणजे अनुकूल असे घालवण्यासाठी नामस्मरणाची गरज आहे. देवाच्या नामचिंतनांनेच आयुष्य गोड, अनुकूल होत असते. त्यासाठी संत महात्मे यांच्याप्रमाणे जीवावर उदार होऊन परमार्थात झोकून द्यावं लागतं असं निरूपण पारनेर येथील प्रसिद्ध कीर्तनकार ह भ प एकनाथ महाराज चत्तर शास्त्री यांनी आपल्या सुश्राव्य अशा कीर्तनातून केले. 

 ‌ राहता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुक येथील प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात स्वतःला झोकून देणारे असे कै. नवनाथ भिमराज पा. जपे यांच्या पाचव्या पुण्यस्मरणा निमित्त आयोजित कीर्तनातून अनेक ओव्या, अभंग, दृष्टांत ,दाखले देत त्यांनी उपस्थितांना धार्मिक व सामाजिक उपदेश करत परमार्थिक मार्गदर्शन केले. 
   ह भ प एकनाथ चत्तर शास्त्री महाराज यावेळी कीर्तनातून मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, आपण जन्माला आल्यानंतर आपलं आयुष्य संसारासाठी खर्च होत असतं. भौतिक सुख मिळावं यासाठी धडपड चाललेली असते. पण ही मिळवलेली भौतिक सुख, संपत्ती ,व कोणतेही पद कायम राहत नाही .ते सावली सारखे असते. आज आपल्या डोक्यावर तर उद्या दुसऱ्याच्या डोक्यावर जाते. इंद्रपद सुद्धा कायम राहत नसतं.आपल्या देशात अनेक राजे आले ,गेले, पण त्यांचे नावही राहिले नाही. पण या सर्वांमध्ये फक्त प्रभू रामचंद्र व छत्रपती शिवाजी महाराज हे दोनच राजे आज सर्वांच्या लक्षात राहिले. कारण ते संत महात्म्यांच्या आदर्शा प्रमाणे जीवन जगले. तेव्हा ते आदर्श महापुरुष झाले. त्यामुळे या जीवनात इतर भौतिक गोष्टीच्या मागे न लागता देवाच्या नाम चिंतनाने आयुष्य गोड होत असते. गोड म्हणजे अनुकूल, गोड हा शब्द अनुकूलता वाचक आहे. संसारात सगळं अनुकूल प्रतिकूल होत नाही ,आनंद- दुःख यांचे संमिश्रण म्हणजे हे जग आहे. तेव्हा या जीवनात आनंद, अनुकूलता, सुखदाई जीवन जाण्यासाठी नाम चिंतन महत्त्वाचे आहे. तेव्हा नाम चिंतनाच्या मागे लागा. नामचिंतन किंवा देवाचं नाव मरताना तोंडात यावं म्हणजे आयुष्य गोड अनुकूल यशस्वी सुखदायी गेल्याचं म्हटलं जातं.पण मरण हे कधी सांगून येत नाही. व मरणाच्या वेळी देवाचं तोंडात नाव येणं हे सहजासहजी एवढं सोपं नाही. कारण जसं गायक गाण्यासाठी अनेक वर्ष सराव करत असतो, तेव्हा अधिक सुरेख गाता येतं. विद्यार्थी एमपीएससी, यूपीएससी तसेच विविध पदवी परीक्षांचा 18 ते 20 तास दररोज अभ्यास करत असतात. तरच ती परीक्षा ते उत्तीर्ण होतात. म्हणजेच कोणतीही गोष्ट करण्यासाठी अगोदर परिश्रम घ्यावे लागते. सहजासहजी कोणतीही गोष्ट मिळत नाही. टपरीवर बसून गुटखा खात, रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांची टिंगल टवाळी करणं सोपं असतं पण आपल्या आई-वडिलांच्या परिस्थितीची जाणीव ठेवून परिस्थितीवर मात करत अभ्यास करणं मोठं अवघड असतं.ती एक जीवनातील मोठी परीक्षा असते. व ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर परिस्थिती बदलायला वेळ लागत नाही .म्हणूनच देवाचं नामस्मरण किंवा देवाचं नाव शेवटी तोंडात येण्यासाठी या जीवनात अगोदरपासूनच नामस्मरण, चिंतन, देवाचे ध्यान, मनन सातत्याने करत राहणं हे महत्त्वाच आहे . तो एक अभ्यास आहे. तेव्हाच परमार्थाची खरीपरीक्षा पास होता येतं.पण आपण तसं करत नाही, माणसाचं चांलण, दिसणं बंद झाल्यानंतर देव,व नामस्मरण आठवतं. पण त्यावेळी काही उपयोग होत नाही. म्हणून आत्ताच पंढरीची वारी करा ,नामस्मरण ,परमार्थात स्वतःला झोकून द्या. तरच हे जीवन सार्थकी लागेल. असे सांगत हे जीवन बेरीज- वजाबाकीचं आहे. ज्याच्यामध्ये कायम वजाबाकी आहे. तो प्रपंच आहे. व ज्याच्यामध्ये आनंद व परमार्थ आहे त्याचं आयुष्य बेरजेचं आहे. या जीवनात संसार करत असताना वय वाढत जातं.स्वतःच्या आयुष्याची वजाबाकी होत असते. मात्र या संसारात परमार्थ केला तर नक्कीच आयुष्याच्या पुण्य शिदोरीची बेरीज वाढत जाते. म्हणून जीवन जगताना आयुष्य नुसते वजाबाकीत घालू नका. बेरजेत घालवा असं सांगत संत तुकाराम महाराज म्हणतात, या मनुष्य अवतारात जन्माला आलो तर या मनुष्य अवताराचा शेवट गोड व्हावा पण त्यासाठी तनमन लावून नामचिंतन केलं पाहिजे. असं सांगत महाराज पुढे म्हणाले की, आपण ज्या महिलेच्या गळ्यात आपल्या नावाचं मंगळसूत्र घालतो ,तिचं आयुष्यभर संरक्षण आपल्याला करावं लागतं. तर मग आपण आपल्या गळ्यात माळरूपी देवाचं मंगळसूत्र घातलेलं असेल तर देवालाही आपलं आयुष्यभर संरक्षण सहकार्य सांभाळ करावं लागतं. नामस्मरणामुळे देव आपल्या मागे पुढे सावली सारखा उभा राहतो. संत महात्मे यांनी आपलं जीवन परमेश्वरावर मोठा विश्वास ठेवून समर्पित केलंलं असतं. कधी दुसरा विचार केलेला नसतो म्हणूनच संत महात्म्यांना देवपण येतं.. विश्वासला या जीवनात खूप मोठं महत्त्व आहे. महाभारतातील कौरव- पांडव युद्धाचा दृष्टांत देत भीष्माने भीष्म प्रतिज्ञा केलेली असतानाही अर्जुनाचा देवावर विश्वास होता. देवा ,श्रीकृष्णा तू आमच्याबरोबर असताना मला चिंता करायची काय गरज आहे, असं अर्जुनाने विश्वासाने म्हटलं होतं. अर्जुनाने श्रीकृष्णावर दाखवलेला विश्वासच पांडवांना विजयी करून गेला. त्यामुळे देवावरचा विश्वास ठाम असावा. पण आज डॉक्टरने सांगितलं की अनेक जण गळ्यातील माळ काढून टाकतात कारण त्यांचा देवावर विश्वास नसतो. परमार्थात जीवावर उदार व्हावं लागतं. तरच खरा परमार्थ साधता येतो. त्यासाठी मोठ्या विश्वासाने व तन मनाने परमेश्वराचे नामस्मरण सातत्याने करणे हेच खरं जीवनातलं गोड सुख समाधान आनंद आहे.असे यावेळी सांगत सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होत आहेत. या सुट्ट्यांमध्ये प्रत्येकाने संत चरित्र वाचत जा, कुठेही कधीही बसून पवित्र ज्ञानेश्वरी वाचा, श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सारखा दुसरा ग्रंथ नाही. या ग्रंथात सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वर महाराजांनी केमोथेरपी सारख्या अनेक गोष्टी यापूर्वी सांगून ठेवलेल्या आहेत. भारत हा पवित्र देश आहे. त्यात संत महात्म्यांचा महाराष्ट्रात आपण जन्माला आलो आहोत. या देशात, राज्यात हिंदू माणसाला ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरणाचा अधिकारच नाही असे दांडेकर म्हणायचे असे सांगत अशा या पवित्र देशात आपण जन्माला आलो. या देशात गोदावरी ,गंगा, गोवर्धन ,गायत्री व गोमाता अशा पवित्र अनेक गोष्टी आहेत. येथे अनेक संत, महात्मे ,राष्ट्रपुरुष, वीर शूर पुरुष जन्माला आले. अशी ही या देशातील पवित्र माती ,भूमी आहे. अशा या देशाच्या राज्याच्या पवित्र भूमीत, अहिल्यानगर सारखा पवित्र जिल्हा आहे .येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी जन्माला आली. संत साईबाबा, संत गंगागीर महाराज, संत नारायणगिरी महाराज, आदींसह विविध संत महात्मे यांचे ही पवित्र भूमी आहे. अशा या अनेक अंगाने पवित्र असणाऱ्या पावन भूमीत आपल्या मुलांना हरिपाठ, पसायदान, रामरक्षा, हनुमान चालीसा ,ज्ञानेश्वरी, विविध ग्रंथ, पारायण वाचायला, पाठ करायला लावा. त्याकडे आई-वडिलांनी लक्ष द्या. ती आज काळाची गरज आहे. मुलगा माळकरी झाला नाही तरी चालेल पण तो व्यसनमुक्त असावा. कारण व्यसनमुक्त युवा पिढीचं देशाची संस्कृती, धर्म, देशाचे संरक्षण प्रगती करू शकते. देशाचे संरक्षण व प्रगती सांभाळण्याची जबाबदारी तरुणांवर आहे व त्यासाठी व्यसनमुक्त तरुणांची आवश्यकता असून व्यसनमुक्तीसाठी अध्यात्मिकते शिवाय दुसरा पर्याय नाही. सत्ता पैसा याने परिवर्तन होत नाही. तर वारकरी संप्रदायाच्या विचारानेच परिवर्तन होऊ शकते. प्रगती घडू शकते. त्यासाठी या जीवनात जीवन जगताना अध्यात्माकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे .असे ह भ प एकनाथ चत्तर शास्त्री महाराज यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमात महाराजांचा ग.भा लिलाबाई नवनाथ जपे, दिलीप भीमराज जपे, सुरेश भीमराज जपे, ज्ञानेश्वर सखाहारी जपे, योगेश नवनाथ जपे, महेश नवनाथ जपे, सौ सविता बाबासाहेब शिंदे, प्रदीप सखाहारी जपे, निलेश दिलीप जपे, चंद्रकांत दिलीप जपे, राहुल सुरेश जपे ,अमोल सुरेश जपे व समस्त जपे पाटील परिवाराच्या वतीने महाराजांचा पुष्पहार घालून श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी काही मान्यवरांनी कै. नवनाथ भीमराज पा.जपे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. कै. नवनाथ भिमराज पाटील जपे हे एक धार्मिक वृत्तीचे व गावात परिसरात एक लोकप्रिय असे व्यक्तिमत्त्व होते. गावातील कोणत्याही धार्मिक सामाजिक शैक्षणिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांच्या जाण्याने धार्मिक क्षेत्रात गावाची मोठी हानी झालेली आहे. आज त्यांना पाच वर्ष झाले असून त्यांना सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.या कार्यक्रमाला जपे परिवार, नातलग, मित्रमंडळी, ग्रामस्थ व भजनी मंडळी, वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments