टाकळीभान प्रतिनिधी :धर्मादाय सह आयुक्त, अहिल्यानगर यांनी आपल्या शासकीय पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागणीसाठी दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी धर्मादाय सह आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्हा कबड्डी असोसिएशन (नोंदणी क्रमांक एफ-२८२) ही संस्था १९७८ पासून कार्यरत आहे. त्याचप्रमाणे अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना (नोंदणी क्रमांक एफ-८६२६) ही स्वतंत्र संस्था २००५ मध्ये नोंदणीकृत आहे.
दरम्यान, अर्जदार विजय बाळासाहेब मिस्कीन यांनी दिनांक ७ ऑगस्ट २०२५ रोजी धर्मादाय उपआयुक्त कार्यालय, अहिल्यानगर येथे बदल अर्ज क्रमांक ७३०/२०२५ दाखल केला. जिल्ह्याचे नाव अहमदनगरवरून अहिल्यानगर करण्यात आल्याने संस्थेच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. त्यानुसार “अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटना” या नावाऐवजी “अहिल्यानगर जिल्हा कबड्डी असोसिएशन” असे नाव नोंदविण्याची मागणी करण्यात आली.
मात्र, संबंधित बदल अर्ज बेकायदेशीररीत्या मंजूर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच या प्रक्रियेत आवश्यक कागदपत्रांची व शपथपत्रांची योग्य पडताळणी करण्यात आली नसल्याचेही सांगण्यात आले.
याप्रकरणात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत,संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करावी, संबंधित कागदपत्रांची तपासणी करून दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, चुकीने नोंदणी झालेल्या संस्थेची नोंदणी रद्द करावी,
संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करावी
, अर्जदार विजय बाळासाहेब मिस्कीन यांनी सादर केलेल्या शपथपत्राची चौकशी करावी, शपथपत्रावर सही करणारे अॅड. एस. बी. गायकवाड यांच्या भूमिकेची चौकशी करावी, धर्मादाय सह आयुक्त श्री. न. वा. जगताप यांनी बदल अर्जाची कायदेशीर पडताळणी का केली नाही याची चौकशी करावी
वरील सर्व मागण्या मान्य न झाल्यास ६ एप्रिलपासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर उल्हास बाबुराव जगताप, उमाकांत लक्ष्मण जगधन, धंनजय विनायकराव धुमाळ, सुनील योसेफ गाडेकर, लक्ष्मण रामभाऊ सुडके आदींच्या सह्या आहे.
0 Comments