हनुमंतगाव वार्ताहर : स्वराज्यभूमी रायगड येथे आयोजित भव्य आणि दिमाखदार समारंभात पत्रकार संदीप गावडे यांना राज्यस्तरीय पत्रकारिता सेवा पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले. ग्रामीण भागातील प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडणाऱ्या त्यांच्या धडाडीच्या आणि निर्भीड पत्रकारितेची राज्यस्तरावर दखल घेत हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
या सोहळ्यात लोकप्रिय मराठी अभिनेते सतीश पाटील यांच्या हस्ते संदीप गावडे यांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र तसेच शाल-श्रीफळ देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. पुरस्कार वितरणाच्या वेळी उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात गावडे यांचे उत्स्फूर्त अभिनंदन केले, ज्यामुळे संपूर्ण सभागृहात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले होते.
संदीप गावडे यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, सामाजिक घडामोडी तसेच स्थानिक पातळीवरील समस्या सातत्याने मांडल्या आहेत. त्यांनी आपल्या लेखणीतून अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला असून त्यामुळेच त्यांनी पत्रकारितेत स्वतःची ठसठशीत ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या सातत्यपूर्ण, प्रामाणिक आणि जनतेशी नाळ जोडणाऱ्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार प्रदान करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी कुदळे ॲग्रो मॉल, राहाता येथील भगीरथ कुदळे यांना ‘महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार’, टीम फिटनेस फॉरेवरचे संचालक जंयत गवारे यांना ‘भारत समाजभूषण पुरस्कार’, ग्रामविकास अधिकारी किशोर माढंरे यांना ‘महाराष्ट्र प्रशासकीय सेवा पुरस्कार’ तसेच प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, लोणीचे संचालक गणपतराव शिंदे यांना ‘छत्रपती शिवराय कृषी भूषण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
0 Comments