सोयगाव दि.०५-- दिंडोरी प्रकरण ताजे असताना सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथील स्मशानभूमी जवळ असलेल्या विहिरीत रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास मालवाहतूक गाडी कोसळली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कंकराळा गावातील युवकांनी तात्काळ विहिरी कडे धाव घेतली. वाहनात कुणी असेल का या शंकेने अख्ख गाव घटनास्थळी हजर झाले. क्रेनच्या सहाय्याने दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानतर विहिरीतून मालवाहतूक वाहन बाहेर काढण्यात यश आले.वाहनात कुणीही नसल्याने सुदैवाने जीवित हानी झाली नाही. एक पोलिस कर्मचारी वगळता प्रशासनाचा एकही अधिकारी घटनास्थळी हजर नव्हता.प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेवर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे विहिरीला कठडे नसलेल्या रस्त्यालगत, काही अंतरावर असलेल्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, कंकराळा येथील रोहित प्रकाश मचे हा स्वमालकीच्या गाडी क्रमांक एम एच ०१- डीआर २८१० या मालवाहतूक गाडीत पाच, सहा क्विंटल गहू भडगाव (जि.जळगाव) येथे नातेवाईकांना देण्यासाठी घेऊन जात असताना त्याने रस्त्याच्या कडेला वाहन उभे करून घराकडे गेला.त्यानंतर सदरील वाहन हे उभ्या असलेल्या जागेवरून हळू पुढे सरकले,थोडे पुढे गेल्यानंतर खड्ड्यात वाहन आदळल्याने ते विहिरीच्या दिशेने वळून सरळ विहिरीत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शीने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. एक पोलिस कर्मचारी वगळता प्रशासनाने या घटनेकडे पाठ फिरवली होती. कंकराळा येथील युवकांनी जागृपणा दाखवित घटनास्थळी धाव घेतली. रस्त्याच्या कामावर असलेले क्रेन घटनास्थळी आणले. मोतीलाल घुसिंगे, बाळू पाटील, शिवसेनेचे (उबाठा) तालुकाप्रमुख दिलीप मचे, उपतालुकाप्रमुख सूर्यभान गवळी,गणेश मचे, बबलू राजपूत आदींसह ग्रामस्थांनी वाहन विहिरातून बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. जीवन उबाळे या युवकाने विहिरीत उतरून वाहनाचे चेसी मध्ये पट्टा अडकविला व दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर वाहन विहिरीतून बाहेर काढण्यात आले. दरम्यान ग्रामपंचायत ला सन २०२०-२१ मध्ये विहीर खोदण्यासाठी परवानगी मिळाली होती. सन २०२३- २४ च्या काळात स्मशानभूमी जवळ ग्रामपंचायतने विहीर खोदकाम केले.विहीर पन्नास फूट खोल खोदण्यात आली असल्याचे नागरिकांनी सांगितले. सध्या विहिरीला चाळीस ते पंचेचाळीस फूट पाणी आहे. विहिरीचे खोदकाम केले मात्र ग्रामपंचायत ने विहिरीला कठडे बांधले नाही. विकास कामांसाठी शासकीय निधी मिळतो,परंतु विहिरीचे काम कुणी केले,त्यापोटी किती रक्कम काढण्यात आली,कुणाच्या नावे रक्कम काढली,रक्कम काढण्यासाठी अत्यावश्यक असलेली प्रक्रिया कशी राबविली गेली हे मात्र निरुत्तरित आहे.दिंडोरी प्रकरणात विहीर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र शासकीय अनुदानातून खोदण्यात आलेल्या विहिरी प्रकरणाची चौकशी होऊन ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसेवक व सदस्य यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल किंवा नाही हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments