राहुरी विधानसभा पोटनिवडणूकीत मोठा ट्विस्ट; अखेरच्या दिवशी पालकमंत्री विखेंच्या मनधरणीला यश, प्राजक्त तनपुरेंची माघार, भाजप स्थापना दिवशी विखेंची पक्षाला गिफ्ट..!





बाळकृष्ण भोसले 
राहुरी (प्रतिनिधी) : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या नाट्यमय घडामोडीने राजकीय वातावरण ढवळून निघाले. 'तू मारण्याचं नाटक करं, मी रडण्याचं नाटकं करतो'. या म्हणीचा प्रत्यय आला. वरवर आजच्या सिनेमाची पटकथा गत आठदहा दिवसापुर्वीच लिहीली गेली असल्याचे राजकीय विश्लेषकांमधून सांगितले जात आहे. तर पालकमंत्री राधाकृष्ण विखे व भाजपा चे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मध्यस्थीला यश येत, पक्षाच्या स्थापनादिनी विखेंचे हे गिफ्ट असल्याचे बोलले जात आहे. 

दरम्यान राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून गोविंद मोकाटे, उबाठा कडून रावसाहेब खेवरे व वंचितने उमेदवारी अर्ज दाखल करत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने बिनविरोधचा प्रयत्न फसला आहे. 
  राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतून माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरेंनी अचानक माघार घेत मैदान सोडण्याच्या निर्णयाने त्यांच्या कार्यकर्त्यांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी मोठ्या राजकीय नाट्यमय घडामोडीने वातावरण ढवळून निघाले. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे अपक्ष अर्ज भरणार असल्याची जोरदार चर्चा मतदार संघात सुरु असतानाच आज सकाळी राहुरी न्यायालयाशेजारील प्राजक्त तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पा. आपल्या लवाजम्यासह दाखल झाले. यावेळी तनपुरे यांनी त्यांचे स्वागत करत, आपल्या दालनात साधारण तासभर विविध विषयांवर चर्चा व सल्लामसलत केली. यावेळी मोठ्या संख्येने संपर्क कार्यालयात व कार्यालयाबाहेर तनपुरे समर्थकांची मोठी गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले. तनपुरेंच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु होती. या वेळी विखे पा., रविंद्र चव्हाणांसोबत अनेक विषयांवर खलबते झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले की, तनपुरे कुटुंबीयांचे परिसर व मतदार संघात मोठे वलय असून, अतिशय योग्य लोकप्रतिनिधी त्यांच्या परिवाराला लाभला आहे. पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे झालेले असून, मतदार संघाच्या हिताच्या दृष्टीने आम्ही तनपुरे यांना विनंती केली आहे. प्राजक्त तनपुरे व त्यांचे सहकारी कार्यकर्त्यांना विनंती आहे की, महायुतीचे सरकार प्राजक्त तनपुरे यांच्याबरोबर आहे. ते जे म्हणतील त्या विकासात्मक व सकारात्मक व त्यांच्या मतदार संघाच्या मागण्यांबाबत महायुती सरकार सकारात्मक राहून सहकार्य करेल.
तसेच डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याबाबत जो प्रस्ताव आलेला आहे, त्यावर मीच प्रमुख असलेले पार्लमेंटरी बोर्ड विचार करते. त्यामुळे यासंदर्भातही योग्य सकारात्मक विचार केला जाईल. पुढील निर्णय प्राजक्त तनपुरे यांच्यावर सोडला असल्याचे, सांगत चव्हाण व पालकमंत्री विखे पा. भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तनपुरेंच्या संपर्क कार्यालयातून रवाना झाले. तनपुरेंनी तद्नंतर पत्रकारांशी बोलताना राहुरीच्या महत्वाच्या प्रलंबित प्रश्नांविषयी पालकमंत्री व प्रदेशाध्यक्षांशी सकारात्मक चर्चा झाली असल्याचे सांगत, आता कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय जाहीर करण्याचे सांगितले. मात्र उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळेत त्यांनी उमेदवार अर्ज दाखल केला नसल्याने, अनेक तर्कवितर्ककांना सध्या उधाण आले आहे. 
   एकीकडे भाजपाचे उमेदवार अक्षय कर्डीले यांना ही निवडणुक सोपी झाल्याचे मानले जात असले तरी राष्ट्रवादी पवार गटाकडून गोविंद मोकाटे यांचा अर्ज दाखल झाला आहे. उबाठा कडून जिल्हाध्यक्ष रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीकडून अनिल जाधव, नगरसेवक संतोष चोळके, प्रहार कडून सुरेश लांबे, शिंदे सेनेचे शेतकरी नेते रवी मोरे यांनीही उमेदवार अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे विद्यापीठातील कार्यक्रमावेळी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसणार आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांना राजकीय 'झटका' दिला आहे. तनपुरेंची माघार घडवून पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी भाजपाला स्थापना दिनाच्या दिवशी जिल्ह्यात आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला पहावयास मिळत आहे.

Post a Comment

0 Comments