शिर्डीत श्रीराम नवमी उत्सवाची काल्याच्या कीर्तनानंतर दहीहंडी फोडून उत्साहात सांगता!

शिर्डी( प्रतिनिधी)-शिर्डी येथील
 श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था वतीने बुधवार दिनांक २५ मार्च पासून सुरु असलेल्‍या श्री रामनवमी उत्‍सवाची सांगता आज शुक्रवारी 27 मार्च रोजी ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांच्‍या काल्याच्या किर्तनानंतर दहिहंडी फोडुन झाली.
शिर्डी येथील श्री राम नवमी उत्‍सवाच्‍या सांगता दिनी शुक्रवार 27 मार्च 2026 रोजी सकाळी संस्‍थानचे प्रशासकिय अधिकारी संदिपकुमार भोसले व त्‍यांच्‍या सुविद्य पत्नी सौ. स्मिता भोसले यांनी श्रींची पाद्यपूजा केली. तसेच गुरुस्‍थान मंदिरात श्री साईबाबा संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व त्‍यांच्‍या सुविद्य पत्नी सौ. वंदना गाडीलकर यांनी रुद्राभिषेक पूजा केली. श्री रामनवमी उत्सवाच्या सांगता दिनी श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मं‍डपाच्‍या स्‍टेजवर सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम महाराज नांदेडकर, गोरटे यांचा काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम संपन्‍न झाला. कीर्तनानंतर समाधी मंदिरात श्री साईबाबांचे समकालीन भक्‍त तात्‍या पाटील कोते यांचे वंशज परीवारातील सदस्‍य श्री अभिराज मिलिंद कोते यांच्‍या हस्‍ते दहिहंडी फोडण्यात आली. यानंतर किर्तनकार महाराज यांचा श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सत्‍कार केला. त्‍यानंतर १२.१० वाजता श्रींची माध्‍यान्‍ह आरती झाली. हनुमान मंदिरा शेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मंडपातील स्टेजवर दुपारी ०१.०० ते ०३.०० यावेळेत कला सौरभ संस्‍था, मुंबई श्री पद्मनाथ ससिहिललू यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम, दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत पुष्‍पांजली संगीत नाट्य अॅकेडमी, बैंगलोर श्री विव्‍दान कोलारा रमेश यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम झाला तर, सायंकाळी ०६.३० वा. श्रींची धुपारती झाली. सायं. ०७.०० ते ०९.३० यावेळेत विजय साखरकर, मुंबई यांचा सरोज प्रस्‍तुत साईस्‍वर नृत्‍योत्‍सव कार्यक्रम होईल. उत्‍सव कालावधीत पार पडलेल्‍या सर्व कार्यक्रमांना श्रोत्‍यांकडून उत्‍स्‍फुर्त प्रतिसाद मिळाला. रात्रौ १०.०० वाजता श्रींची शेजारती होईल. 
हा उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश शिवाजीराव कचरे, समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.), मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) व उप कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले, अतुल वाघ, मुख्‍य लेखाधिकारी मंगला वराडे, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, सर्व विभागप्रमुख व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments