आदिवासी भिल्ल तरुणावर प्राण घातक हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुंडांना अटक करा अन्यथा कोपरगाव पोलीस ठाण्यावर भिल्ल समाजाचा विराट मोर्चा काढण्यात येईल असा इशारा एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे.
कोपरगाव न्यायालयात कामकाजा निमित्त आलेल्या राहुल आप्पा पवार व विशाल मोरे रा. ब्राह्मणगाव या तरुणावर धामणगाव रस्त्याने गावाकडे जात असताना एका टोळग्याने चोपर व लाठ्या काठ्यांनी हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे कोपरगाव शहरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. त्यानंतर हल्लेखोर पळून गेले. जखमींना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय अहिल्यानगर येथे भरती करण्यात आले. एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यानंतर आज ज्ञानेश्वर अहिरे यांनी रुग्णालयात जाऊन जखमी तरुणाची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली.
या वेळी श्री.अहिरे म्हणाले की दिवसा ढवळ्या धारदार शस्त्राने आदिवासी तरुणांवर प्राण घातक हल्ला होतो. कोपरगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चाललाय तरी काय कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढले जात असतानाही पोलीस गप्प का आहेत. कोपरगाव पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहिलेला नाही तसेच अवैध धंद्यांना खतपाणी देण्याचे काम पोलिसांकडूनच होत आहे. आरोपींना कायद्याची भीती राहिलेली नाही. तेव्हा पोलिसांनी आरोपींवर बी. एन. एस. १०९ कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा तसेच २४ तासाच्या आत आरोपींना अटक करावी. आणि आरोपी सापडत नसतील तर त्यांना फरार घोषित करावे. आदिवासी तरुण राहुल पवार याच्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले तसेच जमावाचा उद्देश त्याला जीवे मारण्याचाच होता. एवढा गंभीर गुन्हा घडला असतानाही पोलिसांनी केवळ किरकोळ गुन्हा असल्याचा केविलवाना घूमजाव केला. आज शासकीय रुग्णालय नगर येथे राहुल पवार मृत्यूशी झुंज देत आहे. भिल्ल समाजाच्या भावनांचा उद्रेक होण्याच्या आतच पोलिसांनी आरोपींवर कारवाई करावी अन्यथा आदिवासी तरुणांचा संयम सुटल्यास कोपरगाव शहराची कायदा सुव्यवस्था मोठ्या प्रमाणात बिघडवू शकते. पोलिसांकडे २४ तासाचा कालावधी आहे. आरोपींचा शोध घेऊन त्वरित अटक करा अन्यथा कोपरगाव पोलीस स्टेशनने भिल्ल समाजाच्या मोर्चाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असा गंभीर इशारा यावेळी ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला.
यावेळी एकलव्य भिल्ल सेनेचे जिल्हाध्यक्ष सुभाषराव पवार, विशाल डमाळे, गणेश पवार, मयूर आहेर ,मच्छिंद्र गांगुर्डे ,शंकर माळी ,कृष्णा साळुंखे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
0 Comments