ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन च्या वतीने लेंडी बागेत रातराणी फुल झाडांचा दरवळणार सुवास!

शिर्डी ( प्रतिनिधी ) : सर्वधर्म समभावाचा संदेश देणाऱ्या श्री साईबाबांच्या शिर्डी नगरीत साई मंदिर परिसरातील लेंडी बागेत आज ग्रीन अँड क्लीन शिर्डी फाउंडेशन यांच्या संकल्पनेतून लावण्यात आलेल्या सुहासिक अशा रातराणी फुल झाडांचा सुवास आता संपूर्ण साई मंदिर परिसरात दरवळणार आहे.

 दरम्यान दि.13 फेब्रुवारी 2026 रोजी होऊ घातलेल्या ऐतिहासिक शिर्डी परिक्रमेची घोषणा आज या निमित्ताने करण्यात आली. या कार्यक्रमास साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, शिर्डी नगर परिषदेचे जेष्ठ नगरसेवक अभय राजे शेळके, साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार, नवनिर्वाचित नगरसेवक मंगेश त्रिभुवन, नगरसेवक अमित शेळके, नगरसेवक नंदू गोंदकर, नगरसेवक दीपक गोंदकर, नगरसेवक बापू ठाकरे, ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारख, ॲड अनिल शेजवळ, मनीलाल पटेल, सोसायटीचे संचालक रामभाऊ गागरे, संजय शिरडीकर, मयूर चोळके, ऋषी माळी, मनोज वाघ, माऊली जवक, नारायण दराडे, विश्वनाथ गायकवाड, श्री गवारे, रोहित गुंजाळ, प्रज्वल त्रिभुवन आदी सह साई संस्थान बगीचा विभागाचे भणगे उपस्थित होते. यावेळी प्रधान लेंडी बागेत 50 रातराणीची झाडे मान्यवरांच्या उपस्थितीत लावण्यात आली. यावेळी बोलताना मनीलाल पटेल म्हणाले, 13 फेब्रुवारी 2026 रोजी शिर्डी परिक्रमा महोत्सव असल्याने दरवर्षी नवीन विचार संकल्प समोर येतो आणि पवित्र लेंडी बागेत 50 झाडे लावण्यात आली. ज्या दिवशी या फुलांचा सुगंध चावडी द्वारकामाईपर्यंत पोहोचेल तेव्हाच खऱ्या अर्थाने शिर्डी परिक्रमा आणि ग्रीन अँड क्लीन शिर्डी तसेच शिर्डी ग्रामस्थांचे उद्दिष्ट साध्य होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ज्येष्ठ नगरसेवक अभय शेळके म्हणाले 13 फेब्रुवारी साई भक्तांच्या स्वागतासाठी शिर्डी ग्रामस्थ सज्ज झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या बाबांच्या पवित्र लेंडी बागेत रातराणीची झाडे लावली असून त्याचा सुगंध शिर्डी सह परिसरात दरवळणार आहे. आम्ही सर्व नगरसेवक यासाठी पाऊल उचलले असून आपण देखील या परिक्रमेसाठी पाऊल उचलावे असे आव्हान त्यांनी केले. नगरसेवक दीपक गोंदकर म्हणाले,13 फेब्रुवारी रोजी शिर्डी परिक्रमेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी व्हावे, लेंडी बागेतील या रातराणी फुलांचा सुगंध मंदिर तसेच संपूर्ण परिसरात दरवळेल. नगरसेवक अमित शेळके म्हणाले की बाबांच्या आशीर्वादाने ही लेंडी बाग विकसित होणार असून प्रदूषण मुक्त शिर्डी शहर व्हावे यासाठी सर्वप्रथम आमचा पुढाकार असणार आहे. नगरसेवक मंगेश त्रिभुवन म्हणाले की 1911 मध्ये निस्सीम साईभक्त तात्या पाटील कोते यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता कमिटी स्थापन करण्यात आली होती. 

आज बाबांच्या लेंडी बागेत आमच्या हातून वृक्षारोपण करण्यात आले हे भाग्य आहे. नगरसेवक नंदू गोंदकर यांनी सांगितले की, ग्रीन अँड क्लीन च्या उपक्रमास आमच्या सर्व नगरसेवकांचे भविष्यात सहकार्य राहील. साई संस्थान सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार म्हणाले की, लेंडी बागेत रातराणीच्या सुगंधाने भाविकांना एक प्रकारे ऊर्जा मिळणार असून 13 फेब्रुवारीला होणाऱ्या परिक्रमेत सर्वच साई भक्तांनी सहभागी व्हावे असे आव्हान त्यांनी केले. अँड अनिल शेजवळ म्हणाले की आपण खूप भाग्यवान आहोत की आज आपल्याला या बाबांच्या लेंडी बागेत आपल्या हातून हे वृक्ष लागवडीचे काम बाबांनी घडवून आणले. ग्रीन अँड क्लीन शिर्डीचे अध्यक्ष अजित पारख यांनी 13 फेब्रुवारी 2026 रोजी साईबाबांच्या शिर्डी नगरीत होऊ घालणाऱ्या शिर्डी महा परिक्रमा महोत्सवाची घोषणा करून बाबांच्या प्रधान लेंडी बागेत ग्रीन अँड क्लीन शिर्डी यांच्या संकल्पनेतून रात राणीची झाडे लावण्यात आल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments