दाढ बु येथे श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठानतर्फे भव्य संगीतमय देवी भागवत कथा व साई सच्चरित पारायण सोहळा उत्साहात संपन्न



लोणी प्रतिनिधी (वार्ताहर) ज्ञानेश्वर साबळे – श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान, दाढ बु यांच्या वतीने आयोजित श्री साई सच्चरित पारायण, सन्मान नारीशक्तीचा आणि भव्य संगीतमय देवी भागवत कथा निरुपण सोहळा ह.भ.प. साध्वी सोनालीताई करपे यांच्या सुमधूर वाणीतून दि. २५ डिसेंबर २०२५ ते ०१ जानेवारी २०२६ या कालावधीत अत्यंत भक्तिमय व उत्साही वातावरणात संपन्न झाला. सप्ताहाची सांगता ०१ जानेवारी रोजी काल्याच्या कीर्तनाने झाली.
परममंगलमय, जीवाचे परमकल्याण साधणारी, साधकाला भक्ती-सुखात न्हाऊ घालणारी तसेच भुक्ती-मुक्ती प्रदान करणारी पवित्र श्रीमद् देवी भागवत कथा ऐकण्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. कथाकथनाच्या माध्यमातून साध्वी सोनालीताई करपे यांनी देवीमहात्म्याचे सखोल, प्रेरणादायी व हृदयस्पर्शी निरुपण केले.
या सप्ताह कालावधीत अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मा. शालिनीताई विखे पाटील यांनी उपस्थित राहून कथा श्रवणाचा आनंद घेत भाविकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली.
श्रद्धा ग्रामविकास प्रतिष्ठान गेल्या १७ वर्षांपासून सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. यामध्ये रक्तदान शिबिरे, सर्वरोग निदान व महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, महिलांचे कर्करोग तपासणी व मार्गदर्शन, पाणीटंचाई काळात टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा, मोफत बोअरवेल, शाळांमध्ये एलईडी स्क्रीन, इन्व्हर्टर, पेव्हर ब्लॉक, विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप, कोरोना काळात कोविड सेंटरला आर्थिक मदत, किराणा किट वाटप, औषध फवारणी तसेच नवरात्रोत्सवात सुमारे ८०० महिलांसाठी मोफत दर्शन सहलीचे आयोजन आदी उपक्रमांचा समावेश आहे.
सप्ताहादरम्यान दाढ बु गावातील सर्व युवक मंडळे व तरुणांनी श्रमदानातून महाप्रसादाची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडली. पंगतीनंतर स्वच्छतेचे काम श्री गणेश व दिनेश आरणे यांनी प्रामाणिकपणे केले. आठ दिवस स्वादिष्ट महाप्रसाद तयार करण्याचे कार्य श्री रविंद्र अण्णा बनसोडे, श्री गणेश बनसोडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरीत्या केले. महात्मा फुले विद्यालयाचे विद्यार्थी व सर्व युवक मंडळांनी महाप्रसाद वाटपात सक्रिय सहभाग घेतला.
काल्याच्या कीर्तनानंतर उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल युवा उद्योजक मा. श्री शुभमजी पारख (शिर्डी) यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या सप्ताह सोहळ्यास सहकार्य करणारे भाविक, युवक मंडळे, भजनी मंडळे, दानशूर देणगीदार, अन्नदाते, भाकरी बनविणाऱ्या महिला भगिनी, शालेय विद्यार्थी व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व सहकारी यांचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments