शिर्डी( प्रतिनिधी)-शिर्डी नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी अभय भैय्या शेळके यांची निवड झाली असून राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या उपस्थितीत 13 जानेवारीला लोकनियुक्त नगराध्यक्ष सौ. जयश्रीताई थोरात व नुकतीच निवड झालेले उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
शिर्डी नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अभय शेळके यांची निवड होताच समर्थकांनी नगरपालिका इमारतीसमोर गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करत जल्लोष केला .ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ जयश्रीताई थोरात व उपनगराध्यक्ष अभय शेळके यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.तसेच शिर्डी नगर परिषदेच्या वतीनेही नगराध्यक्ष सौ जयश्री थोरात व अभय राजे शेळके यांनी नामदार विखे पाटील यांचा सत्कार केला. त्याचप्रमाणे स्वीकृत दोन नगरसेवकांचाही नामदार विखे पा. यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. नगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर सर्व नगरसेवक कार्यकर्ते तसेच उपस्थित ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे प्रत्यक्ष भेटून, पुष्पहार घालून तसेच शिर्डी ग्रामस्थांनी सोशल मीडियावर, भ्रमणध्वनी द्वारे अभिनंदन केले आहे.
यावेळी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष तसेच सर्व नगरसेवक हे शिर्डी शहराच्या विकासासाठी नक्कीच प्रयत्न करतील अशी आशा व्यक्त केली. तर नगराध्यक्षा सौ जयश्री ताई थोरात व उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनीही आपल्यावर वरिष्ठ नेते ,ग्रामस्थ व सर्व नगरसेवकांनी ची जबाबदारी दिली आहे ती नक्कीच यशस्वीपणे पार पाडू अशी ग्वाही यावेळी दिली व सर्वांचे यावेळी त्यांनी धन्यवाद मानले. नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष अभय शेळके यांनी शिर्डी शहर हे भयमुक्त ,गुन्हेगारी मुक्त करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत असे यावेळी सांगितले.यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments