दिलीप शिंदे
सोयगाव दि.०८ -- सोयगाव तालुक्यातील ठाणा येथील रहिवासी असलेली आदिवासी महिलेला अजिंठा लेणीत अधिकारी असलेले मनोज पवार यांनी अर्वाच्य भाषेचा वापर करीत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार दि.०७ बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.महिला सक्षमीकरण व स्वावलंबी बनविण्याचा गाजावाजा करणारे लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ देवा भाऊ, एकनाथ भाऊ, अजित भाऊ या मुजोर अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी, सोयगाव तालुक्यातील ठाणा येथील रहिवासी असलेल्या आदिवासी महिला चंद्रभागाबाई हिम्मतराव पाडळकर या नातवाच्या भविष्याचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जळगाव - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या ठाणा फाट्यावर केळी चिप्स चा व्यवसाय करून प्रपंच चालवतात. अजिंठा लेणीत अधिकारी असलेले मनोज पवार हे तीन दिवसांपासून जाणीव पूर्वक त्रास देत होते. दि.०७ बुधवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दुकाना जवळ येऊन अर्वाच्य भाषेचा वापर करीत तुला एकदा सांगितले ना इथे दुकान लावायचे नाही,तुझ्यावर गुन्हा दाखल करतो अशी धमकी देत तयार केलेले चिप्स त्यांनी रस्त्यावर फेकून दिले. या बाबत तक्रार देण्यासाठी फर्दापूर पोलिस ठाण्यात गेले असता त्यांनी बाहेर मिटवण्याचा सल्ला दिला असल्याचे आदिवासी महिला चंद्रभागाबाई पाडळकर यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले. लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ असलेले देवा भाऊ, एकनाथ भाऊ व अजित भाऊ महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध योजना राबवून गाजावाजा करीत आहे.परंतु सकाळी केळी चिप्स चे रस्त्यालगत दुकान लावून स्वावलंबी बनून नातवांचे व कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चंद्रभागाबाई पाडळकर यांना त्रास देणाऱ्या लेणीत अधिकारी असलेल्या मनोज पवार यांच्या वर लाडक्या बहिणींचे सरकार मध्ये बसलेले मुख्यमंत्री व दोघे उपमुख्यमंत्री भाऊ कारवाई करून न्याय देणार की लाडक्या बहिणीला वणवण भटकंती करावी लागणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
0 Comments