राहाता( प्रतिनिधी)
नगर–मनमाड महामार्गावरील गटार कामांना स्थगिती; सुधारित आराखडा सादर करण्याचे निर्दे
नगर–मनमाड महामार्गावरील गटार कामांमुळे व्यापारी व नागरिकांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेची गंभीर दखल घेत, संबंधित कामांना तात्काळ स्थगिती देत सुधारित आराखडा सादर करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. राहता शहराचा विकास हा नियोजनबद्ध, सर्वसमावेशक आणि कुणालाही त्रास न होता व्हावा, या भूमिकेतून डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज शहरातील प्रमुख विकास प्रकल्पांची प्रत्यक्ष पाहणी करत सखोल आढावा घेतला.
यावेळी राहता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर, कैलास बापू सदाफळ, नगरसेवक दशरथ तुपे, राहता नगरपरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लोंढे, महामार्ग विभागाचे अधिकारी, संबंधित प्रशासकीय अधिकारी, भाजपा महायुतीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गाच्या कामात रस्त्याची उंची विद्यमान पातळीपेक्षा ६०० मि.मी. पर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव असल्याने साईड गटारांची उंची मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आली होती. त्यामुळे रस्त्यालगतची दुकाने, व्यापारी आस्थापना व पेट्रोल पंप बाधित होण्याची भीती व्यक्त होत होती. ही बाब लक्षात घेऊन डॉ. सुजय विखे पाटील यांनी महामार्गावरील गटारांचे काम तात्काळ थांबवण्याचे निर्देश देत, रस्त्याची उंची ६०० मि.मी. ऐवजी कमाल ३०० मि.मी. पर्यंत ठेवून गटारासंदर्भात सुधारित आराखडा तयार करण्याचे निर्देश महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिले.
जमिनीखालून आवश्यक खोदकाम करून गटारे करण्याबाबतही यावेळी सूचना देण्यात आल्या. या बदलांनुसार तयार होणाऱ्या सुधारित आराखड्यामुळे पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचणार नाही तसेच रस्त्यालगतचे व्यवसाय, दुकाने व पेट्रोल पंपधारकांना कोणताही त्रास होणार नाही, असे डॉ. विखे पाटील यांनी स्पष्ट केले.
राहता शहरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी डॉ. विखे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स, नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील साईड गटार कामे, इरिगेशन गेस्ट हाऊस, राहता पोलीस स्टेशन तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या प्रस्तावित जागेची पाहणी करून सविस्तर आढावा बैठक घेतली.
जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून जनतेने दिलेल्या जबाबदारीनुसार राहता शहराचा नियोजित व सर्वांगीण विकास व्हावा, या उद्देशाने नगराध्यक्ष स्वाधीन गाडेकर व सर्व नगरसेवकांनी विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार आज ही पाहणी व बैठक पार पडली.
पुढे म्हणाले महामार्ग विभागाने आठवड्याभरात सुधारित आराखडा सादर करावा. त्यासाठी राहता नगर परिषदेचा ठराव तसेच हा राष्ट्रीय महामार्गाचा रस्ते प्रकल्प असल्याने पालकमंत्री महोदयांचे पत्र जोडण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची अंतिम मान्यता घेण्यात येईल, असे मत डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले. राहता ते सावळीविर बुद्रुक नाशिक फाटा दरम्यानचे गटार काम हे सुधारित आराखड्यानुसारच करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ विखे म्हणाले राहाता पोलीस स्टेशनच्या सुमारे सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या भव्य इमारतीच्या कामाची पाहणी करण्यात आली. तसेच ग्रामीण रुग्णालयासाठी इरिगेशन विभागाकडून २० गुंठे जागा उपलब्ध करून देण्यात आली असून, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकल्पासाठी १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या कामांचाही आज प्रत्यक्ष आढावा घेण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स संदर्भात नागरिक व व्यापाऱ्यांकडून प्राप्त झालेल्या विविध तक्रारी तसेच अवैध बाबींवर पोलीस विभागासोबत संयुक्त पाहणी करण्यात आली. कॉम्प्लेक्सच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव हाती घेण्यात येत असून, नियमबाह्य बाबींवर आवश्यक ती कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुढील दोन वर्षांत राहता शहर औद्योगिक व शहरीकरणाच्या दृष्टीने वेगाने पुढे जाणार आहे. विकासकामांमध्ये कोणतीही दिरंगाई किंवा त्रुटी खपवून घेतल्या जाणार नाहीत. मोठ्या प्रकल्पांचा पाठपुरावा मी स्वतः करणार असून, व्यापारी, उद्योजक आणि नागरिकांना कोणताही त्रास न होता पायाभूत सुविधा उभारण्यावर आमचा ठाम भर आहे,असे डॉ. सुजय विखे पाटील यांनी सांगितले.
0 Comments