राजुरी( वार्ताहर : )
ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा जागतिक दर्जा पाहून उझबेकिस्तानमधील प्रोफी विद्यापीठ, ताश्कंद आणि इतर संलग्न देशांच्या प्रतिनिधी समितीने प्रवरा ग्रामीण रुग्णालयाचे तोंडभरून कौतुक केले आहे. येथील वैद्यकिय आधुनिक सुविधांची पाहणी केल्यानंतर, परदेशी रुग्णांना दर्जेदार उपचारांसाठी भारतात आणण्याच्या उद्देशाने प्रवरा रुग्णालय आणि उझबेकिस्तानमधील प्रोफी विद्यापीठ, ताश्कंद यांचेमध्ये सामंजस्य करार झाला असल्याची माहीती कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.
प्रवरा मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील यांच्या उपस्थितीत वैद्यकिय पर्यटन अंतर्गत या प्रोफी विद्यापीठ, ताश्कंदच्या उच्चस्तरीय समितीने रुग्णालयातील विविध विभागांची बारकाईने पाहणी केली. याप्रसंगी विश्वस्त व सह संचालक ध्रूव विखे पाटील, कुलगुरू डॉ.विष्णू मगरे,रूग्णालय प्रशासन संचालक मेजर जनरल (निवृत्त) योगिंदर सिंग,अधिष्ठाता डॉ. सतिश महाजन, रूग्णालय अधिक्षक डॉ. सुरेश जगदाळे, प्रोफी विद्यापीठाचे संस्थापक बेतोष खतामोव, काशिमोव निदीरजॉन, नराझिकुलोव जबरदस्त, मिरकोमिलोव मिराजिज, निखओडजावे उमिद, इशानोवा झिलोला, तुलगनोवा दिलफुजा आदी मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील आधुनिकता पाहून सर्व प्रतिनिधी थक्क झाले. या भेटीदरम्यान परदेशी प्रतिनिधींनी केवळ मशिनरींचीच पाहणी केली नाही, तर रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांशी प्रत्यक्ष संवादही साधला. शहरांपासून दूर ग्रामीण भागात असूनही इतक्या प्रगत सुविधा आणि उच्च दर्जाची रुग्णसेवा उपलब्ध असल्याचे पाहून या प्रतिनिधींनी आश्चर्य व समाधान व्यक्त केले. उझबेकिस्तानातील रुग्णांना भारतात उच्च प्रतीचे उपचार मिळावेत, यासाठी हे केंद्र महत्त्वाचे ठरेल, असा विश्वास समितीने व्यक्त केला.
या कराराबद्दल आनंद व्यक्त करताना डॉ.राजेंद्र विखे पाटील म्हणाले की, "एका ग्रामीण भागातील रुग्णालयासोबत उझबेकिस्तानसारख्या देशाने करार करण्याची इच्छा व्यक्त करणे, ही केवळ प्रवरा परिवारासाठीच नव्हे, तर संपूर्ण देशासाठी भूषणावह बाब आहे."
उझबेकिस्तान समितीने प्रवरेतील उपचारांच्या जागतिक दर्जावर शिक्कामोर्तब केले आहे. वैद्यकीय पर्यटन या करारामुळे परदेशी रुग्ण उपचारांसाठी लोणीसारख्या ग्रामीण भागात येणार असून, भारतीय आरोग्यसेवेला मोठी गती मिळणार आहे. या भेटीमुळे प्रवरा ग्रामीण रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर या संस्थेचा लौकिक पोहोचला आहे.
0 Comments