राहुरी (प्रतिनिधी) : पत्रकार संघाची उद्दिष्टे, कार्यपद्धती बरोबरच ग्रामीण पत्रकारांच्या हक्क व संरक्षणासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, तसेच भविष्यातील नियोजनाचे काम नेटकेपणाने करत, संघाचे कार्य अधिक व्यापक व प्रभावी करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे. पत्रकारांबरोबरच समाजातील दुर्लक्षित घटक व शासनदरबारी त्यांच्या रखडलेल्या कामासाठी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक जबाबदारी पार पाडण्याचे आवाहन निर्भय व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण भोसले यांनी केले.
निर्भय युवा ग्रामीण पत्रकार संघाची महत्वपूर्ण बैठक रविवार, दि. २१ जून २०२६ रोजी तालुक्यातील धर्माडी टेकडी गेस्ट हाऊस येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. संघटनेच्या बळकटीकरणासाठी तसेच आगामी उपक्रमांचे नियोजन, ग्रामीण पत्रकारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा तसेच कार्यकारिणीतील विविध नियुक्त्या व पदोन्नती जाहीर करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीत संघटनेच्या कार्यकारिणीतील विविध पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या. तसेच संघटनेत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. यात दिपक मकासरे यांची राहुरी तालुका उपाध्यक्षपदी तर प्रमोद डफळ यांची तालुका सचिवपदी पदोन्नती जाहीर करण्यात आली. याशिवाय कार्यकारिणीच्या विविध नियुक्त्याही यावेळी जाहीर करण्यात आल्या.
तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परिक्षेत तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील प्रतीक संतोष बनसोडे यांनी राज्यात घवघवीत यश मिळवत त्यांची नगररचनाकार पदावर नियुक्ती झाल्याबद्दल गुणगौरव करण्यात आला. बैठकीदरम्यान संघटनेच्या विस्तारासाठी आवश्यक उपाययोजना, ग्रामीण भागातील पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, पत्रकारांच्या हक्क व संरक्षणासाठी राबविण्यात येणारे उपक्रम तसेच आगामी कार्यक्रमांचे नियोजन यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हासचिव राजेंद्र म्हसे, जिल्हा सहसचिव राजेंद्र पवार, जिल्हासंघटक आर. आर. जाधव, तालुका अध्यक्ष अशोक मंडलिक, तालुका उपाध्यक्ष दीपक मकासरे, तालुका सचिव प्रमोद डफळ, सहखजिनदार जावेद शेख, मधुकर म्हसे, खजिनदार कमलेश विधाटे, दिनेश गायकवाड, अप्पासाहेब मकासरे, देवेंद्र शिंदे, अनिकेत विधाटे, दिपक साळवे, उमेश बाचकर, प्रशांत जोशी, युनुस शेख यांच्यासह अनेक पत्रकार सदस्य बैठकीस उपस्थित होते.
नवनियुक्त तसेच पदोन्नती झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. संघटनेचे कार्य अधिक प्रभावीपणे पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
बैठकीचे सूत्रसंचालन अशोक मंडलिक यांनी तर तालुका सचिव प्रमोद डफळ यांनी आभार प्रदर्शन केले.
0 Comments