खरेदीखत एका गटात, बांधकाम दुसऱ्याच गटात? ढवळपुरीत सतलोक आश्रम वादाच्या भोवऱ्यात! सतलोक आश्रमाचे कार्यक्रम रोखण्याची मागणी, तीव्र आंदोलनाचा इशारा

पारनेर तालुका प्रतिनिधी 

आदिवासींच्या जमिनींचे परस्पर व्यवहार कसे झाले? ढवळपुरीतील भूमाफियांविरोधात संताप
तालुक्यातील ढवळपुरी येथील आदिवासी बांधवांच्या जमिनीवरील वाद पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. संबंधित जमीन आदिवासींना प्रत्यक्ष ताब्यात मिळेपर्यंत त्या ठिकाणी सतलोक आश्रम (मुनिंदर धर्मार्थ ट्रस्ट, हरियाणा) यांनी कोणतेही कार्यक्रम घेऊ नयेत, अशी ठाम भूमिका आदिवासी समाजाने घेतली आहे. यासंदर्भात पारनेर पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन कडक कारवाईची आणि आवश्यक सहकार्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. मागणी करण्यात यावेळी एकलव्य सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे, राया ठाकर फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष लहू मधे, सह्याद्री आदिवासी संघटनेचे जिल्हा सचिव संजय पथवे मनाजी मधे, बाळू मधे, मारुती केदार, हिरामण केदार, उमाजी केदार, पोपट केदार, भीमा चिकणे, भाऊ केदार, विश्वनाथ पवार, प्रवीण केदार, पांडू केदार, बाळू चिकणे, जिजाबा मधे, महादू पवार, आदी आदिवासी समाजातील ग्रामस्थ तसेच जमीन धारक उपस्थित होते.

निवेदनात नमूद केल्यानुसार, ढवळपुरी येथील आदिवासी समाजाच्या जमिनी बेकायदेशीररीत्या हस्तांतरित करून त्यांची परस्पर खरेदी-विक्री करण्यात आली आहे. यामुळे अनेक आदिवासी कुटुंबे भूमिहीन झाली आहेत. मुळात आदिवासी जमीन हस्तांतरणास कायद्याने बंदी असताना हे व्यवहार झालेच कसे, असा सवाल उपस्थित करत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या व्यवहारांमध्ये शासनाची परवानगी, आदिवासींची संमती, पुनर्वसन प्रक्रिया आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका यावरही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले आहे.
आदिवासी बांधवांच्या म्हणण्यानुसार, मुनिंदर धर्मार्थ ट्रस्टचे खरेदीखत गट क्रमांक ११२०/१ मध्ये आहे. मात्र, प्रत्यक्षात बांधकाम गट क्रमांक ११२०/२/१ ते ६ या क्षेत्रात सुरू आहे. त्यामुळे या बांधकामाची कायदेशीरता तपासून अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सध्या खरीप हंगामाची सुरुवात झाली असून जमिनीची नांगरणी व पेरणीची वेळ आली आहे. त्यामुळे ही जमीन तातडीने ताब्यात मिळावी, अशी मागणी आदिवासींनी केली आहे. पेरणीसाठी जात असताना जर कोणी अडथळा निर्माण केला, तर कायदेशीर मार्गाने अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

चौकट :तीव्र आंदोलनाचा पवित्रा..
संबंधित जमिनीचा ताबा आदिवासींनी घ्यावा, असा आदेश तहसीलदार स्तरावर आधीच झालेला असल्याचा दावा आंदोलकांनी केला आहे. जोपर्यंत जमीन पूर्णपणे परत मिळत नाही, तोपर्यंत सतलोक आश्रमाने तिथे कोणतेही धार्मिक किंवा इतर कार्यक्रम घेऊ नयेत; अन्यथा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा एकलव्य सेनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे आणि राया ठाकर फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष लहू मधे यांच्यासह सह्याद्री आदिवासी संघटनेचे सचिव संजय पथवे आदिवासी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
चौकट : सतलोक आश्रम ने जर आदिवासी समाजाच्या जमिनीवरील ताबा काढला नाही तर सर्व आदिवासी बांधवांना एकत्र करून पारनेर तहसील व पोलीस प्रशासन यांना निवेदन देत आंदोलन करू व उपोषण करू सर्व आदिवासी बांधवांची जमीन ही पुन्हा मागे मिळाली पाहिजे आदिवासी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका आदिवासी क्रांतिकारक राया ठाकर फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष लहू मधे व सह्याद्री आदिवासी संघटनेचे जिल्हा सचिव संजय पथवे यांनी घेतली आहे.

Post a Comment

0 Comments