लोहगाव (वार्ताहर): प्रवरानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी संकुलात दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित पत्रकार दिनानिमित्त प्रवरा परिसरातील पत्रकार मित्रांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सार्वमतचे ज्येष्ठ पत्रकार कोंडीराम नेहे यांचा स्नेहवस्र, बुके देऊन प्राचार्य विनायक मेथवडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत डॉ. शरद दुधाट यांनी केले. यावेळी आपल्या मनोगतातून प्राचार्य विनायक मेथवडे म्हणाले की, बाळशास्त्री जांभेकर हे केवळ पत्रकारच नव्हे तर शिक्षण आणि इतिहास संशोधक होते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून समाजातील समस्या मांडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. अन्यायाला वाचा फोडणे आणि जनतेपर्यंत सत्य व वास्तव माहिती पोहोचविणे ही पत्रकारांची महत्त्वाची भूमिका आहे. याप्रसंगी उपमुख्याध्यापक दिलीप डहाळे, पर्यवेक्षिका संगीता सांगळे, प्र. उपप्राचार्य संजय डुबे, संजय ठाकरे, बाबासाहेब अंत्रे, विलास गभाले यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. शेवटी नरेंद्र ठाकरे यांनी आभार मानले.
0 Comments