टाकळीभान प्रतिनिधी- विविध शासकीय योजनांचा लाभ देताना एकल महिलांना प्राधान्य देण्यात यावे, असे स्पष्ट निर्देश तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी दिले.
मंगळवारी तहसीलदारांच्या दालनात श्रीरामपूर तालुका मिशन वात्सल्य शासकीय समितीची बैठक तहसीलदार वाघ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संबंधित सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना त्यांनी आवश्यक सूचना केल्या.
या बैठकीस समितीचे अशासकीय सदस्य मिलिंदकुमार साळवे, बाळासाहेब जपे, सदस्य
सचिव तथा प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे, तालुका संरक्षण अधिकारी दीपाली भिसे, श्रीरामपूर नगरपालिकेचे प्रतिनिधी व समुदाय संघटक हरिष पैठणे, पंचायत समितीचे दीपक त्रिभुवन, पशुधन विकास अधिकारी एस. डी. सोनवणे, बांधकाम विभागाचे व्ही. एम. राठोड, आरोग्य विभागाच्या एम. एस. करपे व एस. टी. निमसे, तहसीलच्या संजय गांधी विभागाचे एन. जी. नाईक, पुरवठा निरीक्षक एस. यु. पुजारी उपस्थित होते.
प्रारंभी सदस्य सचिव शोभा शिंदे यांनी मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन केले. अंगणवाडीसेविकांच्या माध्यमातून श्रीरामपूर तालुक्याच्या ग्रामीण भागात एकल महिलांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून, या सर्वेक्षणातून साडे दहा हजार एकल महिलांची माहिती संकलित झाल्याचे त्यांनी सांगितले.
एकल महिला सर्वेक्षणाचे काम उत्कृष्टरीत्या केल्याबद्दल मिलिंदकुमार साळवे यांनी तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, पर्यवेक्षिका व प्रभारी बालविकास प्रकल्पाधिकारी शोभा शिंदे यांचे अभिनंदन करणारा ठराव मांडला. या ठरावाला बाळासाहेब जपे यांनी अनुमोदन दिले.
संजय गांधी निराधार योजना, स्वस्त धान्य योजना तसेच तहसील कार्यालयाशी संबंधित एकल महिलांच्या अडीअडचणी तातडीने सोडविण्यात येतील, असे तहसीलदार वाघ यांनी स्पष्ट केले.
महसूल विभागाच्या जनलक्ष्मी योजनेअंतर्गत एकल महिलांची नावे त्यांच्या स्थावर मालमत्तेच्या सातबारा उताऱ्यावर नोंदविण्यात येत आहेत. या योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत, असे तहसीलदार मिलिंदकुमार वाघ यांनी सांगितले.
0 Comments