गोवर्धनमपुर येथील आदिवासींवर अन्याय करणाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा-ज्ञानेश्वर अहिरे

गोवर्धनमपुर येथील आदिवासींवर अन्याय करणाऱ्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करा-ज्ञानेश्वर अहिरे
------------------------------
श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धनपुर येथील आदिवासी भिल्ल तरुणावर प्राण घातक हल्ला करून येथील महिलांचा विनयभंग करणाऱ्या गाव गुंडावर  ॲट्रॉसिटी चा गुन्हा दाखल करा अशी मागणी एकलव्य भिल्ल सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी उप विभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर यांच्याकडे निवेदना द्वारे केली आहे.
      श्री. अहिरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की ,तालुक्यातील गोवर्धनपुर येथील रवींद्र उत्तम मोरे या तरुणाला त्याच गावातील कैलास नानासाहेब औताडे याने‌ जातिवाचक शिवीगाळ करून त्याच्यावर प्राण घातक हल्ला केला त्याच्यामध्ये हा आदिवासी तरुण ‌अतिशय गंभीर जखमी झाला आहे. या तरुणावर टामीने अतिशय मोठ्या प्रमाणे हल्ला करून त्याला जखमी केले आहे. तसेच तेथील आदिवासी महिला भांडण सोडवण्यासाठी   पुढे आल्या तर या आरोपीने घरात घुसून जातीवाचक शिवीगाळ केली व त्यांच्या बरोबर लज्जा उत्पन्न होईल असे अतिशय घाणेरडे वर्तन केले. सध्या हा आदिवासी तरुण साखर कामगार हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे. अध्यापही श्रीरामपूर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केलेला नाही. आदिवासी महिलांवर एवढा गंभीर प्रसंग घडला असतानाही पोलीस गप्प का आहेत . पोलिसांनी कारवाई न केल्याने आरोपी गावामध्ये मोकाट फिरत आहे एवढा मोठा गंभीर गुन्हा घडला असतानाही पोलीस  का कारवाई करत नाहीत असा प्रश्न आदिवासींना पडला आहे. गावामध्ये आदिवासी महिला अतिशय दहशतीखाली असून अतिशय भीतीचे वातावरण आदिवासींमध्ये पसरले आहे. या आदिवासींनी श्रीरामपूर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन फिर्याद देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांची फिर्याद घेतली गेली नाही.  व या आदिवासींना पोलीस स्टेशन मधून परत घरी पाठवण्यात आले.  त्यामुळे पोलीसच या आरोपीला पाठीशी घालतात की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी पोलिसांनी  आदिवासी तरुण व येथील महिलांची रीतसर फिर्याद घ्यावी व या आरोपीवर त्वरित अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याप्रमाणे कारवाई करावी व आदिवासींना न्याय द्यावा अन्यथा गोवर्धनपूर येथील सर्व आदिवासी भिल्ल समाज पोलीस उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महिला व मुलाबाळांसह बेमुदत आमरण उपोषण सुरू करतील असा इशारा या वेळी ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला. निवेदनावर तंट्या तात्या क्रांती फोर्सचे अध्यक्ष एकनाथराव गांगुर्डे, सुनील मोरे, सोन्याबापु मोरे, ज्योती मोरे यांच्या सहया आहेत.

Post a Comment

0 Comments