न्यू इंग्लिश स्कूल, टाकळीभानच्या खेळाडूंना योग्य न्याय द्यावा . -विद्यालयाची जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांकडे मागणी-



टाकळीभान: कर्जत येथे झालेल्या १७ वर्षांखालील अहिल्यानगर जिल्हास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विरोधी कर्जत संघाच्या समर्थकांनी रयत शिक्षण संस्थेच्या टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल व आण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या संघातील खेळाडूंना मारहाण करून जखमी केल्याने टाकळीभान संघाच्या खेळाडूंवर अन्याय झाला असून जिल्ह्याच्या ठिकाणी सामना घेऊन टाकळीभान संघातील खेळाडूंना न्याय द्यावा अशी मागणी विद्यालयाने जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांच्याकडे केली आहे .
           रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य बापूसाहेब पटारे, विद्यालयाचे मुख्याध्यापक आर .एम शिंदे , क्रीडा शिक्षक एस. एस . राठोड, क्रीडा संघटक अनिल पटारे यांनी नुकतीच अहिल्यानगर जिल्ह्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरंगे यांची भेट घेऊन न्यू इंग्लिश स्कूलच्या खेळाडूंना बाहेरच्या लोकांकडून झालेल्या मारहाणीबाबत तक्रार केली . यावेळी निवेदनात म्हटले आहे की ,दि ३ ऑक्टोबर २०२५ रोजी कर्जत येथे अहिल्यानगर जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचा अंतिम सामना झाला . स्थानिक समर्थ विद्यालयाचा संघ पिछाडीवर गेल्याचे दिसताच स्थानिक लोक व समर्थ विद्यालयाच्या क्रीडा मार्गदर्शक यांनी खेळाच्या ग्राऊंडमध्ये घुसून आमच्या विद्यालयाच्या खेळाडूंना व मार्गदर्शक शिक्षकांना मारहाण करण्यास सुरुवात केली . त्यामुळे खेळाडू घाबरले . त्यांचे मानसिक मनोबल खचले . यात तीन खेळाडू जखमी झालेले आहे . त्यांची मेडिकल तपासणी केली आहे . त्याचा अहवाल मिळाला आहे . त्याबाबत आपण चौकशी करावी व संबंधितांवर योग्य ती कार्यवाही करावी .तसेच हा अंतिम सामना जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या समक्ष पुन्हा अहिल्यानगर येथे घेण्यात येऊन आमच्या विद्यालयाच्या खेळाडूंना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आलेली आहे .

Post a Comment

0 Comments