पर्वती माता फक्त शिवाची अर्धांगिनी नसून तीच शिवा ची प्रगट स्वरूप , सृष्टी शक्ती आणि तीच आहे आत्मशक्ती --महंत आत्माराम गिरीजी महाराज

शिर्डी (प्रतिनिधी)--- “पार्वती” या शब्दाचा अध्यात्मिक अर्थ आणि त्यातील “ज्ञान, इच्छा आणि क्रिया”या त्रिविध पर्वांचा गूढार्थ अत्यंत गहन आहे. मेरा शिव भोला है,!पार्वती का स्वामी है l l

 ‘पार्वती’  माता‌ही पर्वांची अधिष्ठात्री शक्ती आहे.‘पार्वती’ हा शब्द केवळ देवता म्हणून नव्हे तर चेतनेच्या त्रिविध शक्तींचे प्रतीक म्हणूनही समजावा लागतो.संस्कृतमध्ये “पर्व” म्हणजे उच्च शिखर, टप्पा किंवा उन्नतीचा स्तर. त्यामुळे “पर्ववती” म्हणजे ती जी पर्वांना धारण करते, पर्वांची अधिष्ठात्री असते ती  म्हणजेच ज्ञान, इच्छा आणि क्रिया या तीन पर्वांची स्वामिनी पार्वती माता होय. अशी माहिती श्री नर्मदेश्वर सेवाधामचे महंत आत्माराम गिरीजी महाराज यांनी दिली आहे. सध्या दीपावली पर्व उत्साहात साजरा होत असून त्यांनी सर्व भक्तांना, साधकांना व सर्व नागरिकांना दीपावली निमित्त  शुभेच्छा रुपी आशीर्वाद देत  पुढे म्हटले आहे की,ज्ञान पर्व म्हणजे  आत्मबोधाची शिखरे होय.ज्ञान म्हणजे चेतनेचा प्रकाश होय.पार्वतीचे पहिले पर्व म्हणजे ज्ञान पर्व, जे शिवाच्या तत्त्वाशी तिला एकरूप करते.
 ज्ञान म्हणजे वस्तूंच्या स्वरूपाचा खरा बोध  "मी कोण आहे?" या प्रश्नाचे उत्तर आहे.
पार्वतीचे ज्ञान हे केवळ पुस्तकातील नव्हे, तर अनुभवात्मक ज्ञान आहे . जे शिवाशी एकत्व साधते.
जेव्हा साधक आपल्या अंतःकरणातील अज्ञानरूपी आवरण दूर करतो, तेव्हा पार्वतीची ज्ञानशक्ती त्याच्यात जागृत होते.हीच शक्ती चित्शक्ती म्हणून ओळखली जाते. शिव म्हणजे ज्ञानस्वरूप, आणि पार्वती म्हणजे त्या ज्ञानाला कार्यान्वित करणारी चेतना आहे.तर इच्छा पर्व  म्हणजे सृष्टीची प्रेरणा होय.
हे दुसरे पर्व म्हणजे इच्छा पर्व ,
सृष्टीची सुरुवात ही इच्छेतूनच होते  “बहुस्याम् प्रजायेय” (मी अनेक होईन) ही परमात्म्याची पहिली इच्छा आहे.
पार्वतीचे हे रूप म्हणजे इच्छाशक्ती, जी सृष्टीचा आरंभ घडवते.साधकाच्या अंतःकरणातही हीच इच्छा आत्मबोधाच्या दिशेने प्रवाहित होते.ही इच्छा वैयक्तिक नसून, दैवी प्रेरणा आहे . जी आत्मोन्नती, धर्मसंवर्धन आणि कल्याण यासाठी कार्य करते.
पार्वती म्हणून हीच शक्ती भक्ताला शिवाच्या सान्निध्याकडे ओढते. इच्छा हीच साधकाला योगमार्गावर नेणारी पहिली प्रेरणा असते.तसेच
 क्रिया पर्व म्हणजे शक्तीचा प्रवाह होय .तिसरे पर्व म्हणजे क्रिया पर्व होय‌, म्हणजेच इच्छेचे फलित, कर्मात रूपांतर होणे.
पार्वतीचे हे स्वरूप म्हणजे क्रियाशक्ती, जी सृष्टीच्या प्रत्येक कणात गतिशील आहे.
ज्ञानाने दिशा मिळते, इच्छेने प्रेरणा मिळते, आणि क्रियेतून त्या दोघांचा संयोग फलद्रूप होतो.
क्रिया पर्व म्हणजे शक्तीचे प्रकटीकरण होय. तीच योगिनी, तीच माता, तीच सृष्टिकर्त्री होय.
साधकाच्या जीवनात ही क्रियाशक्ती सत्कर्म, साधना आणि सेवेच्या रूपाने प्रकट होते.
शिवाचे स्थिर तत्त्व आणि पार्वतीची गतिशील शक्ती  या दोघांच्या मिलनातूनच सृष्टी, पालन आणि लय घडते.  शिव आणि शक्ती यांचा अविभक्त मिलापच ज्ञान–इच्छा–क्रिया त्रिपर्व होय. त्रिपर्वांचा समन्वय म्हणजे पूर्ण पार्वतीतत्त्व होय.
जेव्हा या तिन्ही पर्वांचा संतुलित समन्वय साधला जातो.
ज्ञान अज्ञानाचे निवारण करते,
इच्छा योग्य दिशेने प्रवाहित होते,
आणि क्रिया त्या इच्छेला सत्यरूप देते.तेव्हा साधक पार्वतीतत्त्वात प्रवेश करतो.
ही अवस्था म्हणजे शक्ती आणि शिवाचा अद्वैत अनुभव होय.
जिथे ज्ञाता, ज्ञान आणि ज्ञेय यांचे त्रित्वही लय पावते. “पार्वती” म्हणजे ती, जी या तीन पर्वांची  ज्ञान, इच्छा आणि क्रिया यांची अधिष्ठात्री आहे.
ती निसर्गातील प्रत्येक ऊर्जेत, साधकाच्या प्रत्येक श्वासात, आणि आत्म्याच्या प्रत्येक चेतनेत विद्यमान आहे.
पार्वती ही फक्त शिवाची अर्धांगिनी नसून  तीच शिवाची प्रकट स्वरूप, तीच सृष्टिशक्ती, आणि तीच आत्मशक्ती आहे. ज्ञान हे तिचे तेज, इच्छा तिचा स्पंदन, आणि क्रिया तिचे रूप.
या तिन्ही पर्वांमध्येच पार्वतीचे पूर्णत्व सामावलेले आहे. असे श्री नर्मदेश्वर संन्यासी महंत आत्मारामगिरी महाराज  पिंपरी निर्मळ तालुका राहता यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments