अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्तांना मदत म्हणून शिर्डीचे साई संस्थान मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रुपये मदत देणार!

शिर्डी ( प्रतिनिधी)-राजकुमार गडकरी 
महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे तसेच नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपत शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी रूपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले आहे. 

त्याचप्रमाणे शिर्डी व परिसरात शनिवार पासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे. काही घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्याची गरज निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थान प्रशासनातर्फे साई आश्रम क्रमांक दोन येथे तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच अशा नागरिकांसाठी साई संस्थांच्या  प्रसादालयात भोजनाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे.अजूनही ज्या नागरिकांना गैरसोय भासत आहे, त्यांनी या सोयींचा लाभ घ्यावा, असे आवाहन साई संस्थान प्रशासनाकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे शेगाव येथील गजानन महाराज संस्थान यांच्याकडूनही पूरग्रस्तांसाठी एक कोटी अकरा लाखाची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे धनादेशाद्वारे सुपूर्त करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments